भात उरलाय? भाताचे चमचमीत पदार्थ

भात उरलाय? उरलेल्या भाताचे चमचमीत पदार्थ

भात खाऊन वजन वाढतं हा मोठ्ठा गैरसमज आहे. पक्क्या कोब्रा असलेल्या असलेल्या दिवेकरताई भात, पोहे बिंधास्त खा असं सतत सांगत असतात. सांगण्याचा हेतू असा की तुमची आई, आजी खात असलेले म्हणजेच आपला पिंड ज्यावर पोसला आहे असे अन्न शरीरासाठी आरोग्यदायी असते. हे झाले ढोबळ विधान.

वजनवाढीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास अमुक एका कारणाने वजन वाढते असे सरसकट म्हणता येणार नाही. वजनवाढीची अनेकानेक वैयक्तिक कारणे असतात.
अनुवंशिकता, शरीरातील हाॅर्मोन्समध्ये होणारे बदल, प्रत्येकाचा चयापचयाचा दर, काही अाजार आणि जिकडे जाऊन सगळं घोडं अडतं ते म्हणजे व्यायामाचा अभाव अशी अनेक.

हे सर्व आख्यान कोणासाठी तर पट्टीच्या भातखाऊंसाठी. वजनबिजन गेलं खड्ड्यात, जेवताना भात खाल्ला नाही तर समाधान होत नाही असं म्हणणारे अनेकजण असतात. भात आणि पोळी हे भारतीयांच्या जेवणातील मुख्य पदार्थ आहेत. कितीही मोजून मापून करायचा प्रयत्न केला तरी बर्याचदा भात उरतोच. बर प्रत्येक वेळेस फोडणीचा भात हे आॅप्शन खूप बोर होतं. शिवाय कधी कधी तो भात इतका थोडा असतो की सगळ्यांच्या पुरवठ्याला येणं शक्य नसतं. धड ठेववत नाही आणि फेकवतही नाही. मग काय करायचं? ह्या प्रश्नाला माझं उत्तर असेल कश्यातही ढकला. म्हणजे नक्की काय? तर आजची पोस्ट.

दुसरी गोष्ट अशी की खालचे काही काही फोटो बघून तुम्ही म्हणाल, आता ह्यात भात आहे हे आम्हाला बुवा कसं कळणार! तर त्याचं असं आहे मंडळी ‘खादाडी’वर जे पण काय अासतं ते समंद वरिजनलच आसतय. कायपण फेकाफेकी नाय. कारण माझे स्वयंपाकघरातले प्रयोग, थोडीफार फोटोग्राफी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे लिखाणाची हौस पूर्ण करण्यासाठीच ‘खादाडी’चा जन्म झाला आहे. तेव्हा आता काय करायचं, ही पोस्ट वाचून काही करून बघाल तेव्हा मला लगेच कळवायचं. भात दिसलातरी किवा नाही दिसला तरीही!

उरलेल्या भाताचे पदार्थ, भाताच्या रेसिपीज, भात पुलाव प्रकार, bache hue chawal ki recipes, फोडणीचा भात

1. फोडणीचा भात –

हिंग, मोहरी, हळद घालून खमंग फोडणी करा. आवडीप्रमाणे फोडणीत जिरं, कढिपत्ता, शेंगदाणे, कांदा, टाॅमॅटो घाला. भात घालून मीठ घाला आणि परतून घ्या.

दही भात, दही बुत्ती, उरलेला भात, शिळा भात, curd rice, rice recipes, leftover rice, zestyflavours

2. दही भात किंवा दही बुत्ती –

उन्हाळ्यात हा भात खाण्यासारखं सुख नाही. थंडगार, तरीही मस्त चमचमीत. भातात चवीप्रमाणे दूध, दही, मीठ, साखर घालून भात सारखा करा. आलं आणि हिरवी मिरची घालून मिक्स करा. छाेट्या कढईत तूप गरम करा. मोहरी, हिंग, कढिपत्ता आणि सुक्या मिरच्या घालून चरचरीत फोडणी करून भातावर ओता.

मसाले भात, भाताचे प्रकार, उरलेला भात, indian fried rice, leftover rice recipes, zestyflavoures

3. मसाले भात –

परतलेली, कोरडी भाजी उरली असेल तर ती या भातात खपवता येते. मी सिमला मिरचीची भाजी घातली आहे. फोडणीसाठी तेल गरम करून आधी त्यात थोडेसे काजू परतून घ्या आणि बाजूला काढून ठेवा. आता नेहमीसारखी फोडणी करा. फोडणीतच नारळ किंवा सुकं खोबरं यापैकी जे आवडत असेल ते घाला. छान लाल झालं की त्यातच चमचाभर गोडा किंवा गरम मसाला घाला. मिनिटभर परतून त्यावर भात घाला. भाजी घालून मीठ घाला आणि झाकण ठेवून एक वाफ काढा. वाढताना वर काजू, खोबरं, कोथिंबीर घाला.

चायनीज फ्राईड राईस, भाताचे प्रकार, उरलेला भात, शिळा भात, chinese fried rice, leftover rice recipes,

4. चायनीज फ्राईड राईस –

भाज्या चिरायला घेण्याआधी भात मोकळा करून ताटात पसरून ठेवा. हिरवा/जांभळा कोबी, सिमला मिरची, कांदापात, फरसबी, गाजर यापैकी असतील त्या भाज्या भरपूर प्रमाणात खूप बारीक चिरून घ्या. सुक्या मिरच्या आणि लसून वाटून घ्या. कढईत तेल कडकडीत गरम करा. वाटण घालून थोडसं परतून घ्या. खमंग करायचं नाहीये. गॅस मोठाच असू दे. आता भाज्या घालून भराभर परतत चायनीज स्टाईलमध्ये करकरीत शिजवून घ्या. त्यावर भात घाला. भातात टाॅमेटो केचप, चिली साॅस, सोया साॅस आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून गॅस बंद करा.

हे सुद्धा बघा –

ट्रॅडिशनल चायनीज व्हेज डम्पलिंग्ज रेसिपी

भजी रेसिपीज, उरलेल्या भाताचा उपयोग, शिळा भात, पकोडे रेसापी, leftover rice recipes

5. साधी सोप्पी भजी –

खेकडा भजीला चिरतो तसे कांदे उभे, पातळ चिरून घ्या. त्यात कुस्करलेला भात, हळद, तिखट, मीठ आणि ओवा घालून मिक्स करा. थोड्या वेळाने मिश्रणाला पाणी सुटले की त्यात मावेल तितके चणा डाळीचे पीठ (बेसन) घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरम तेलाचे मोहन घालून भजी तळा.

चीज बाॅल्स, भाताचे चमचमीत पदार्थ, उरलेला भात, leftover rice recipes, zestyflavours, cheese balls, baked recipes

6. चीज बाॅल्स –

उकडलेले बटाटे आणि भात एकत्र मळून घ्या. त्यात मीठ मिरपूड, ओरिगॅनो, मिक्स हर्ब्ज आणि भरपूर चीज किसून घाला. लहान लहान गोळे करून तेलात तळून घ्या किंवा ओव्हनमध्ये बेक करा. मी बेक केले होते. 180० C ला 15 मिनिटांत छान खुसखुशीत बेक झाले. ओरिगॅनो, मिक्स हर्बऐवजी आवडत असल्यास हळद, तिखट, गरम मसालाही घालू शकता.

 

One thought on “भात उरलाय? भाताचे चमचमीत पदार्थ

  1. आचार्य अत्रे यांच्या भाषेत सांगायचे झाले तर गेल्या १०० वर्षात असा भात मी खाल्ला नाही

Leave a Reply