बेक्ड मठरी – पौष्टिक आणि खुसखुशीत मठरी

Baked Mathri – Healthy And Crispy Mathri Recipe

महाराष्ट्रात खारे शंकरपाळे करतात. त्याचेच उत्तर भारतीय version म्हणजे मठरी. शंकरपाळे करताना पातळ पोळी लाटली जाते. खारे शंकरपाळे फुगलेले असतात आणि खायला कुरकुरीत लागतात. पण मठरी जाडसर करतात आणि ती खुसखुशीत असणे अपेक्षित असते.
ह्यात चवीसाठी मसाले घालताना भरपूर प्रयोग करता येतील. ओवा, मिरपूड, तीळ, खसखस, नेहमीचं लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, मिक्स हर्ब्स इ. आवडीप्रमाणे आलटून पालटून घालता येईल.
तळण नको होतं म्हणून मी मठरी ओव्हनमध्ये बेक केल्या, पण अर्थातच तुम्हाला हवं असेल तर तळूही शकता.
साहित्य –
4 वाट्या कणिक किंवा मैदा
(मी केलेल्या कणकेच्या आहेत)
4 टे स्पून रवा
2 टे स्पून ओवा
2 टे स्पून मिरपूड (बारीक किंवा जाडसर कुटलेली)
2 टे स्पून कसुरी मेथी (ऐच्छिक)
1 टी स्पून बेकिंग पावडर
1 वाटी तेल
चवीप्रमाणे मीठ
कृती –
कणिक एका मोठ्या पातेल्यात किंवा परातीत घ्या.
कणकेत रवा, सगळे कोरडे मसाले आणि बेकिंग पावडरही घाला.
मीठ घालून सगळं नीट मिक्स करून घ्या.
आता कणकेत वाटीभर गार तेल घाला.
बोटांनी चोळून तेलही कणकेत मिसळून अगदी एकजीव करून घ्या.
आता लागेल तसे पाणी घालून कणिक पुर्‍यांच्या कणकेपेक्षा घट्ट भिजवा
अर्धा तास झाकून ठेवा.श
त्यानंतर थोडासा पाण्याचा हात लावून कणिक पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून सारखी करून घ्या.
कुकी शीटला किंवा बेकिंग ट्रेला अॅल्युमिनीअम फाॅईल लावून, तेलाचा हात फिरवून तयार ठेवा.
कणकेचा लहानसा गोळा (अंदाजे सुपारीएवढा) घेऊन दोन तळहातात दाबून चपटा करा.
बोटांनी फिरवून मठरी सारखी करून घ्या.
खूप पातळ करू नका. जाडसरच ठेवा.
अश्या सगळ्या मठरी तयार करून ट्रेमध्ये मांडून घ्या.
ओव्हन 180॰C/350॰F ला प्रीहिट करून घ्या.
ओव्हनमध्ये 20 – 25 मिनिटे गुलाबी रंग येईपर्यंत मठरी बेक करा.
बाहेर काढून पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद कंटेनरमध्ये भरून ठेवा.
नुसत्या खायलाही या मठरी छान लागतात किंवा केचप, एखादी आंबट – गोड चटणी किंवा आवडीच्या कोणत्याही डीपबरोबर खाऊ शकता
.

Leave a Reply