झेब्रा केक (एगलेस) – स्टेप बाय स्टेप फोटो आणि व्हिडिओ रेसिपी

Eggless Zebra Cake Recipe – With Step by Step Photos and Video Recipe

इतका देखणा दिसतो ना हा केक की विचारूच नका. फक्त आणि फक्त करून बघण्याचीच गोष्ट आहे. करायच्या आधी मलाही धाकधूक वाटंत होती. जमेल की नाही, लेयर्स एकमेकांत मिक्स तर होणार नाही ना. पण अजिबात अवघड नाहीये, खूप सोप्पा आहे.

साहित्य –
11/2 कप साखर
1 कप दूध
1 कप तेल
2 टी स्पून दही

2 कप मैदा किंवा कणिक
2 टे स्पून कोको किवा 1/4 कप चाॅकलेट पावडर
(चव आणि रंग बघून अॅडजस्ट करा.)
1 टी स्पून बेकिंग पावडर
1/2 टी स्पून बेकिंग सोडा
2 – 4 टे स्पून दूध
1 टी स्पून व्हॅनिला इसेन्स किंवा पावडर

कृती –
साखर, तेल, दही आणि एक कप दूध मिक्सरच्या भांड्यात घालून ब्लेंड करून एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या.
मैद्यात बेकिंग पावडर आणि सोडा घालून चाळून घ्या आणि ओल्या मिश्रणाच्या बाऊलमध्ये मिक्स करा.
त्यात व्हॅनिला इसेन्स घाला.
आता हे केकचे मिश्रण दोन बाऊलमध्ये अर्धे अर्धे काढून घ्या.
एका भागात कोको पावडर घाला आणि ढवळा.
म्हणजे आपल्याला दोन प्रकार मिळतील.
एक प्लेन आणि एक चाॅकलेट फ्लेवर.

प्रत्येक बाऊलमध्ये 1 – 2 टे स्पून दूध घालून कन्सिसटन्सी अॅडजस्ट करून घ्या.
एकीकडे ओव्हन 180॰ C ला 10 मिनिटे प्रिहीट करा.
केक टिनला बटर पेपर किंवा फाॅईल लावून, तेल लावून ग्रीस करा.
आता मुख्य काम म्हणजे बॅटर पसरणे.
चमचा लहान मोठा कसा आहे त्याप्रमाणे एक – दोन चमचे बॅटर प्रत्येक वेळेस घ्या.
सुरवातीला टिनच्या मधोमध चाॅकलेटी बॅटर घालून थोडेसे गोल पसरून घ्या.
डोसा करतो तसे.
आता त्यावर प्लेन बॅटर घाला.
वजनाने खालचे बॅटर आपोआप पसरेल.
असं एकावर एक आलटून पालटून दोन्ही बॅटर संपेपर्यंत टाकत राहा.
आता बाऊलच्या कडेने सुरवात करून टूथपिकने तळापासून अधिकच्या चिन्हात (+) मिश्रणाचे चार भाग करा.
पुन्हा क्राॅस (x) करून आठ भाग करा.
म्हणजे झेब्र्याचे पट्टे तयार होतील.
पट्टे करून झाले की केक टिन हलक्या हाताने एक दोन वेळा ओट्यावर आपटल्यासारखा करा, म्हणजे हवा निघून जाईल.
35 मिनिटांचे टायमिंग सेट करून केक बेक करायला ठेवा.
25 मिनिटांनंतर टूथपिक घालून चेक करा.
25 – 35 मिनिटांत टिनच्या साइजप्रमाणे केक बेक होतो.
टूथपिक स्वच्छ निघाल्यावर केक बाहेर काढून थंड करा.

भारताबाहेर मिळणारी ग्रॅन्युलेटेड साखर बर्‍याचदा कमी गोड असते.

मी दिड कप साखर आणि पाव कप नेसक्विक घेतले होते.

कारण तसेही केकवर आयसिंग वगैरे करायचे नाहीये.
पांढरा रंग उठून दिसण्यासाठी यावेळेस मी मैदा घेतला आहे.

पट्टे व्यवस्थित आणि भरपूर दिसावेत म्हणून मी केक टिन 10 इंचाचा घेतला होता.

तुमच्या आवडीप्रमाणे 8 – 10 इंचाचे भांडे घ्या.
त्याप्रमाणे केक कमी जास्त फुगेल.

One thought on “झेब्रा केक (एगलेस) – स्टेप बाय स्टेप फोटो आणि व्हिडिओ रेसिपी

Leave a Reply