होममेड ब्रेड पिझ्झा – कमी कटकटीची, सोपी आणि झटपट होणारी पिझ्झा रेसिपी

No Fuss Easy And Quick Homemade Bread Pizza

होममेड पिझ्झा, ब्रेड पिझ्झा, पिझ्झा रेसिपी, झटपट पिझ्झा, homemade pizza, bread pizza, zestyflavours, pizza recipe marathi
महिना – दिड महिना झाला बाहेरून काहीही आॅर्डर केलं नाहीये. इतके दिवस बाहेरचं खायचं नाही, त्यातही पिझ्झा नाही म्हणजे डोक्यावरून पाणी. सुदैवाने आमच्याकडे सुपर मार्केटस् मध्ये सगळं बर्‍यापैकी मिळतय. थोडफार काही काही गोष्टींचं शाॅर्टेज कधी कधी दिसतं. पण अजिबात अडत नाहीये. Intelligent lockdown झिंदाबाद!
काल मग ग्रोसरी करताना लिस्टमध्ये पहिला नंबर श्रेडेड चीजचा लावला आणि यिस्टही आणलं.
बेसपासून सगळी तयारी करून पिझ्झाची खिंड लढवायची होती. पण आयत्या वेळेस कंटाळा आल्यामुळे प्लॅन चेंज झाला आणि पिझ्झाचा मूड तर बनलाच होता. मग ब्रेड पिझ्झाचा ठराव पास झाला.
टाॅपिंगसाठी हिरवी, लाल, पिवळी सिमला मिरची आणि कांदा घेतला. फुल टू रंगिबेरंगी. आमच्याकडे
अल्बर्ट हाइनमध्ये लाल, पिवळी आणि हिरवी किंवा आॅरेंज अश्या तीन रंगांच्या सिमला मिरचीच पॅकेट मिळतं. मस्त ताज्या करकरीत असतात.
तिन्ही रंगाची एकेक मोठी सिमला मिरची आणि कांदा बारीक चौकोनी चिरून घेतला. कढईत थोडसं बटर गरम करून भाज्या मोठ्या आचेवर 4 – 5 मिनिटे परतून (saute) घेतल्या. कांदा जरासा मऊ होईपर्यंत. मग गॅस बंद करून त्यात चवीपुरतं मीठ आणि ओरिगॅनो घातलं.
मग मला काही काम नव्हतं. बाकीचं सगळं मनालीनी केलं. सामान आणायला गेले तेव्हा पिझ्झा साॅस मिळाला नव्हता. रेडिमेड मीठ नसलेली टाॅमॅटो बेसिल प्युरी घेतली होती. ती आणि घरी होते ते सगळे म्हणजे पेस्तो, एगलेस मेयाॅनिज, मस्टर्ड साॅस असं हाताला लागेल ते घालून मस्त spread तयार केला. त्यातही चवीला मीठ आणि भरपूर ओरिगॅनो घातलं.
आमच्याकडे स्वयंपाक करताना वरणभात, पोळीभाजी, पोहे उपमा टाईप पदार्थ आईने करायचे आणि काँटिनेन्टलचं खातं मनालीकडे. आयत्या वेळेस जे असेल ते ब्रेड, नूडल्स, भाज्या, चीज, अंडी, साॅसेस असं सगळं घालून रेस्तराँसारखी यम्मी डिश समोर येते.
आता ओव्हन 180॰ C ला प्रीहिट केला. 10 मिनिटे. मग सगळ्या ब्रेड स्लाइसेसना बटर लावून पिझ्झा साॅस लावला. ब्रेड 5 मिनिटे ओव्हनमध्ये ठेवला. बाहेर काढून तयार केलेल्या भाज्या आणि त्यावर चीज घातलं.
20 मिनिटांचं टायमिंग सेट करून बेकिंग शीट आत ढकलली. 15 मिनिटातचं चीज व्यवस्थित बबल व्हायला लागलं. ही बॅच रेडी.
दुसरी बॅच करताना तयार भाज्या थोड्या कमी पडतील असं वाटलं. मग टाॅपिंगमध्ये पालक अॅड केला. बेबी स्पिनॅच होता. हातानी फक्त मोठे मोठे तुकडे केले. मनालीला चीजही घाल भरपूर असा आईकडून ग्रीन सिग्नल मिळाला.😀 भरपूर चीजशिवाय पिझ्झाला मझा नाही. एकीकडे सुक्या मिरच्या पटकन मिक्सरमधून काढून चिली फ्लेक्सपण होममेड, ओरिगॅनो अर्थातचं विकतचं.
पुढच्या 15 मिनिटांत घरभर मस्त ताज्या ताज्या खमंग पिझ्झाचा खरपूस सुगंध पसरला होता. एकदम गरमागरम, चविष्ट आणि कुरकुरीत. 100% आॅथेंटिक. बाहेरच्या पिझ्झाच्या तोंडात मारेल असा झालाय. इति नवरा.

Leave a Reply