मँगो आईस्क्रीम – हापूस आंब्याचे

मँगो आईस्क्रीम – हापूस आंब्याचे आईस्क्रीम

मँगो आईस्क्रीम, आंब्याचे आईस्क्रीम, मँगो कूल्फी, आईस्क्रीम रेसिपीज मराठी, mango icecream, icecream recipes marathi, mango kulfee
लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रीम सगळ्यांनाच आवडते. एरवी विशेष गोड न खाणार्‍यांचीही आईस्क्रीमला ना नसते. हल्ली आपण बाराही महिने आईस्क्रीम खात असतो – खाऊ शकतो. हे सगळं कितीही खरं असलं तरी कडक उन्हाळ्यात थंडगार आईस्क्रीम स्वर्गीय चवीचे लागते.
दरवर्षी उन्हाळा आला की सर्वत्र जुन्या काळातल्या पाॅट आईस्क्रीमच्या आठवणी ऐकायला, वाचायला मिळतात. माझ्या लहानपणी कल्याणला काही सुप्रसिद्ध आईस्क्रीमवाले होते. अहिल्याबाई चौकातल्या ‘महाराष्ट्र कोल्ड्रिंक्स’ने जे आमच्या घराशेजारीचं होतं, कल्याणकरांना वेड लावल होतं. महाराष्ट्र कोल्ड्रिंक्समध्ये सर्वोत्कृष्ट चवीचा फालुदा आणि कसाटा आईस्क्रीम त्याकाळी मिळायचे. अशीच शिवाजी चौकातली वडाच्या पानावरची कुल्फी. कुल्फीवाला ती कापून वडाच्या पानावर ठेवून खायला द्यायचा. उन्हाळ्यात रात्री फिरत फिरत जाऊन गांधी चौकातल्या ‘तायडे आईस्क्रीम’ची चव चाखणे म्हणजे कल्याणकरांसाठी पर्वणी होती.
नंतर काॅलेजच्या काळात खास ब्रँड म्हणजे वाडीलाल, गोकुळची चलती होती. आईस्क्रीम विकत आणा किंवा घरी करा, रंगीबेरंगी, सुंदर सजावट केलेले आईस्क्रीम दिसायलाही सुरेखच दिसते. घरी आईस्क्रीम करताना वेगवेगळे स्वाद वापरण्याबरोबरचं सजावटही आपण अापली कल्पनाशक्ती वापरून अनेक प्रकारे करू शकतो. तेही सोप्प्या पद्धतीने.
तर सुरुवात करूया आंब्याच्या आईस्क्रीमने.
साहित्य –
1 वाटी दूध (शक्यतो फुल क्रिम)
1 वाटी कोणतीही मिल्क पावडर
1 वाटी साय (घरची घट्ट साय किंवा अमूल क्रिम)
1 वाटी आंब्याचा रस
(उत्तम नैसर्गिक रंग आणि स्वादासाठी हापूस आंब्याला पर्याय नाही)
चवीप्रमाणे साखर
थोड्या बारीक चौकोनी चिरलेल्या आंब्याच्या फोडी
कृती –
मिक्सरच्या जारमध्ये दूध, साय, मिल्क पावडर आणि आंब्याचा रस घालून फिरवून घ्या.
खूप जास्त फिरवू नका.
मिश्रण व्यवस्थित एकत्र होऊन थोडं फुगल्यासारखे दिसेल इतपतच फिरवा.
आता चव बघून तुमच्या गोडाच्या आवडीप्रमाणे साखर घाला.
बारीक चिरलेल्या आंब्याच्या फोडीही घाला.
घट्ट झाकणाच्या डब्यात घालून मिश्रण सेट होण्यासाठी फ्रिजरमध्ये ठेवून द्या.
7 – 8 तासात आईस्क्रीम तयार होते.
आईस्क्रीम सेट करायला ठेवल्यावर वाटल्यास एकदा बाहेर काढून बीट करून घ्या.
सारखं बीट करावं लागत नाही.
फुल क्रिम दूध वापरल्यास अजिबात बर्फाचे खडे होत नाहीत.
आईस्क्रीम छान मऊ होते.
तुम्हाला नको असल्यास आईस्क्रीममध्ये आंब्याच्या फोडी नाही घातल्या तरी चालतील.
नुसते प्लेन आईस्क्रीमही चांगले लागते.
पण फिक्कट पिवळ्या आईस्क्रीममध्ये गडद, केशरी रंगाच्या आंब्याच्या फोडी खूप छान दिसतात आणि लागतातही.
आईस्क्रीम खायला देताना वरूनही थोड्या बारीक चिरलेल्या फोडी घाला.
हापूस आंब्याचाच इतका सुंदर, नैसर्गिक स्वाद आणि रंग आईस्क्रीमला येतो की बाकी कोणताही कृत्रिम रंग किंवा इसेन्स वापरावा लागत नाही.

Leave a Reply