शेव टोमॅटोची भाजी – गुजराती पद्धतीची

Sev Tameta Nu Shaak – Sev Tamatar Ki Sabji – Without Onion And Garlic Sabji

नेहमीच्या खानदेशी शेवभाजीपेक्षा ही भाजी वेगळी आहे. गुजराती पद्धतीची ही भाजी करायला सोप्पी आहे. कांदा, लसूण न घालताही अतिशय चवदार लागते. शिवाय वाटणघाटण करण्यात वेळ न जाता आयत्या वेळेस करता येते. त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही ‘जेठालाल’ स्पेशल भाजी नक्की करून बघा.

शेव टाॅमॅटो भाजी, गुजराती पद्धत, sev tamatar shaak, saag, sev ki sabzi, zesty flavours

साहित्य –
4 – 5 टोमॅटो
1 वाटीभर जाडी शेव (साधी किंवा कोणत्याही स्वादाची)
3 – 4 टे स्पून तेल
2 – 3 हिरव्या मिरच्या
1 आल्याचा तुकडा
1टी स्पून लाल तिखट
1/2 टी स्पून धणेपूड
1/2 टी स्पून गरम मसाला
थोडीशी साखर
मीठ
फोडणीसाठी –
मोहरी
जिरं
हिंग
हळद

कृती –
कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग आणि हळद घालून खमंग फोडणी करा.
हिरवी मिरची आणि आलं बारीक चिरून किंवा वाटून घाला.
दोन मिनिटं परतून त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला.
टोमॅटो थोडा मऊ झाला की त्यात तिखट, धणेपूड आणि गरम मसाला घालून परतून घ्या.
चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालून झाकण ठेवा.
टोमॅटोचा लगदा होऊन, तेल सुटेपर्यंत शिजवा.
टोमॅटो व्यवस्थित शिजले की त्यात साधारण वाटीभर पाणी घालून एक दोन उकळ्या येऊ द्या.
खायला घेताना अगदी गरम ग्रेव्हीमध्ये शेव घालून 2 – 4 मिनिटे झाकण ठेवा.
म्हणजे शेव हवी तितकी मऊ होईल.
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
फुलके, बाजरीची भाकरी किंवा साध्या भाताबरोबर ही भाजी असली की मस्त बेत होतो.

ह्या भाजीसाठी कांदा किंवा लसणीची आवश्यकता नाही.
पण तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता.
रतलामी किंवा लसूण शेव चवीला तिखट असते, शिवाय शेवेतही मीठ असते.
त्यानुसार तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मीठाचे प्रमाण कमी जास्त करा.

Leave a Reply