फोडणीच्या मिरच्या (लोणचे) – घरगुती मसाल्याच्या कृतीसह

Super Tasty Green Chilli Pickle / Sauce With Homemade Masala

green chilli pickle, spicy pickle, mirchi ka achar, lonache masala recipe, achar masala, zesty flavours
अनेकजण याला खारातल्या मिरच्या असेही म्हणतात. फोडणीच्या मिरच्या करताना मिरच्यांचे लहान लहान तुकडे करतात. पण त्याएवजी मिरच्या मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घेतल्यास काम खूप सोपे होते. याचे बरेच फायदे आहेत. मिरच्या चिरताना हातांची आग होत नाही. शिवाय वाटून केल्यामुळे लोणचे खूप छान मिळून येते. बर्‍याचदा फोडणीच्या मिरच्या खाताना आवडत नाही किंवा तिखट लागतात इ. कारणांमुळे मिरच्यांचे तुकडे बाजूला करून फक्त खारच खाल्ला जातो. मिरच्या वाटून घेतल्या तर हा प्रश्नच येत नाही. त्यामुळे थोडंस लोणचं घेतलं तरी पुरतं आणि काहीही वाया जात नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे या फोडणीच्या मिरच्या करताना मी कोणताही तयार लोणचे मसाला वापरला नाहीये. अगदी मोहरीची डाळही नाही. त्यामुळे ताज्या घरगुती मसाल्यातल्या या फोडणीच्या मिरच्या खूपच चटपटीत लागतात आणि तितक्याच चटकन करताही येतात.

साहित्य –
2 वाट्या हिरव्या मिरच्यांचे लहान तुकडे किंवा वाटलेल्या मिरच्या
1/2 वाटी लिंबाचा रस
1/2 वाटी किंवा थोडसं कमी मीठ
मसाल्यासाठी –
1/2 वाटी मोहरी (नेहमीची)
2 टी स्पून मेथी दाणे
1 टी स्पून हळद
2 टे स्पून तेल
फोडणीसाठी –
1/2 वाटी तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून हळद
1/2 टी स्पून हिंग

कृती –
मिरच्या स्वच्छ धुऊन अगदी पूर्ण वाळू द्या.
मिरच्या कोरड्या होण्यासाठी पुरेसा वेळ द्या.
कोरड्या झाल्या की मिरच्यांचे लहान लहान तुकडे करा किंवा मिक्सरमधून वाटून घ्या.
लिंबाचा रस आणि मीठ घालून मिक्स करा.
एकिकडे फोडणी करून ती गार होऊ द्या.
अर्धी वाटी तेल कडकडीत तापले की मोहरी आणि हिंग घालून फोडणी करा.
गॅस बंद करून दोन मिनिटे किंचीत थंड झाली की हळद घाला.
म्हणजे हळद न जळता छान रंग येईल.
मसाल्यासाठी मोहरी, मेथी आणि चमचाभर हळद मिक्सरमध्ये अगदी बारीक करा किंवा थोडीशी रवाळ दळली तरी चालेल.
हा मसाला एका वाटीत काढून ठेवा.
छोट्या कढईत दोन चमचे तेल चांगले गरम करा.
तेल मस्त तापले की मसाल्यावर ओतून कालवून घ्या.
हा मसालाही व्यवस्थित गार होऊ द्या.
मसाला आणि फोडणी गार झाली की मिरच्यांवर ओतून सगळं मिक्स करून घ्या.

2 thoughts on “फोडणीच्या मिरच्या (लोणचे) – घरगुती मसाल्याच्या कृतीसह

Leave a Reply