सोप्पी होममेड चाॅकलेटस्

Easy and Quick – Homemade Chocolate Recipe

homemade chocolates, chocolate compound, easy recipe, quick recipe, sweets, milk, white, dark chocolate, zesty flavours
बाजारात चकचकीत, गुळगुळीत, सुबकशा पॅकिंगमध्ये प्रसिद्ध कंपन्यांची चाॅकलेटस् 5-10 रुपयांना मिळत असताना कशाला एवढा खटाटोप करायचा असा प्रश्न पडणे साहाजिकच आहे. पण हौशी मंडळींना अर्थातच हे म्हणणे पटणार नाही. सतत नावीन्याच्या शोधात असणार्‍यांना काहीतरी वेगळेपणा हवाच असतो.
कोणत्याही खास प्रसंगी तुमच्या प्रियजनांना, मित्रमंडळींना स्वत: तयार केलेली ही गोड भेटवस्तू देऊन बघा. सगळ्यांना नक्की आवडेल.
बाजारात Morde या नावाने चाॅकलेटचे स्लॅब मिळतात. 400 ग्रॅमचे कम्पाउंडस् 100 ते 125 रुपयांना उपलब्ध आहेत. मिल्क, डार्क आणि व्हाइट असे तीन फ्लेवर ह्यात तुम्हाला मिळू शकतात. 100 ग्रॅम चाॅकलेट वापरुन मध्यम आकाराची 12 ते 15 चाॅकलेटस् आपण करु शकतो. म्हणजे जवळ जवळ 25-30 रुपयांत सुंदर आकाराची आणि चवीची बाहेर मिळतात तशीच चाॅकलेटस् घरी तयार करून स्वनिर्मितीचा आनंद तुम्हाला मिळवता येईल.
ह्यासाठी दुकानात प्लास्टिक आणि सिलीकाॅनचे वेगवेगळ्या आकाराचे साचे सहज उपलब्ध आहेत. प्लास्टिकचे साचे वापरताना त्याला तुपाचा किंचीत हात फिरवून घेणे आवश्यक आहे. पण सिलीकाॅनचे साचे वापरायला अतिशय सोप्पे पडतात. चाॅकलेट पटकन डिमोल्ड करता येते. ह्याला ग्रीस करावे लागत नाही.
homemade chocolate recipe, chocolate compound, zesty flavours
चाॅकलेट करताना स्लॅब्ज् दोन पद्धतीने वितळवून घेता येतात. त्यातली एक म्हणजे डबल बाॅयलर. गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवा. पाण्याला उकळी आली की गॅस मंद करा. आता पातेल्यावर व्यवस्थित बसेल असा एक काचेचा किंवा स्टीलचा बाऊल ठेवा. पातेल्यात पाणी थोडेसेच घ्या. वर ठेवलेल्या बाउलच्या तळाला पाणी लागू देऊ नका. आपल्याला फक्त वाफेवर चाॅकलेट गरम करायचे आहे. आवश्यक तेवढे चाॅकलेट लहान तुकडे करून बाऊलमध्ये घ्या आणि चमच्याने सतत ढवळत राहा. काही सेकंदातच चाॅकलेट पातळ होईल. लगेच गॅस बंद करा.
पातळ असलेले चाॅकलेट चमच्याने साच्यांमध्ये घाला. हलक्या हाताने साचे ओट्यावर आपटल्यासारखे करा. म्हणजे चाॅकलेटमधले हवेचे बुडबुडे निघून जातील आणि चाॅकलेट स्मूथ दिसेल. त्यानंतर चाॅकलेट सेट होण्यासाठी, तयार केलेले साचे अर्धा ते एक तास फ्रिजमध्ये ठेवा. सेट झाल्यावर बाहेर काढून रॅपिंग पेपरमध्ये पॅक करा किंवा नुसतेच हवाबंद डब्यात ठेवले तरी चालेल. शक्यतो तयार चाॅकलेटस् फ्रिजमध्येच ठेवा. कारण गरम वातावरणात चाॅकलेट वितळू शकते.
दुसरी पद्धत म्हणजे मायक्रोवेव वापरणे. मी नेहमी मायक्रोवेवमध्येच करते. अजिबात पसारा न होता पटकन काम होते. फक्त मायक्रोवेव वापरताना सगळा वेळ एकदम सेट करु नका. उदा: 100 ग्रॅमचा स्लॅब पातळ होण्यासाठी एक मिनिट लागणार असेल तर दर 10-20 सेकंदांनी थांबून चाॅकलेट व्यवस्थित ढवळून घ्यायचे म्हणजे जळणार नाही. थोडक्यात सलग 10-20 सेकंदांपेक्षा जास्त वेळ गरम करु नका.
homemade chocolate, easy, quick, sweets, chocolate recipes, zesty flavours
ही झाली बेसिक चाॅकलेटस्. आपली कल्पनाशक्ती वापरून ह्याची असंख्य व्हेरिएशन्स तुम्ही करु शकता.
मागच्या वर्षी पहिल्यांदा ही पोस्ट मी माझ्या फेसबुक पेजवर शेअर केली होती. तेव्हा मी भारतात होते. परदेशातील वाचकांना चाॅकलेट कम्पाउंडस् किंवा कुकींग चाॅकलेटच्या भरपूर व्हरायटीज ग्रोसरी स्टोरमध्ये मिळू शकतात.

Leave a Reply