बटाट्याचे पराठे – सारण न भरता सोपी कृती

Aloo Paratha Recipe Without Stuffing

आमच्याकडे आता आलू पराठ्याची फारशी क्रेझ उरली नाहीये. याआधी जेवायला काय करू? या प्रश्नाला मुलींचे ठराविक उत्तर असायचे – आलू पराठे! आता रोज कसे आलू पराठे करायचे? पण तरीही एक मेन्यू म्हणून अधून मधून केले जातातचं. तेवढाच एक दिवस सुटतो. यावेळेस एकदा आलू पराठे केल्यानंतर फ्रिजमध्ये थोडेसे सारण उरले होते. त्याचे परत भरून (stuffed) पराठे करायचे नव्हते, तेवढे सगळ्यांना पुरलेही नसते. मग आहे त्याच सारणात मावेल तेवढी कणिक घालून पराठे केले. अजिबात पाणी नसल्यामुळे हे पराठे अगदी मऊ होतात आणि खुसखुशीत लागतात. त्यामुळे आता असेच पराठे कर असा ठराव पास झाला आहे.🙂

aloo parathe, without stuffing, easy recipe, paratha recipes, पोळ्या, पुर्‍या, पराठे, zesty flavours

साहित्य –

4 – 5 मध्यम आकाराचे बटाटे

अंदाजे 4 – 5 वाट्या कणिक (बटाट्यात मावेल तेवढी)
1/2 वाटी बेसन पीठ
8 – 10 लसूण पाकळ्या
4 – 5 हिरव्या मिरच्या
1 आल्याचा तुकडा
1 टी स्पून लाल तिखट
1/2 टी स्पून चाट मसाला
1 टी स्पून हळद (ऐच्छिक, रंग हवा असल्यास)
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर/कांदापात/कसुरी मेथी
(मी कसुरी मेथी घातली आहे.)
चवीप्रमाणे मीठ

कृती –
बटाटे उकडून, थंड करून घ्या.
बटाटे शक्यतो हवेवरच थंड करा.
पटकन गार होण्यासाठी बर्‍याचदा आपण बटाटे पाण्यात घालतो.
पण त्यामुळे बटाटे पाणी शोषून घेतात आणि सारण सैल होण्याची शक्यता असते.
बटाटे गार झाल्यावर, सालं काढून कुस्करून घ्या.
बटाट्यात सगळे मसाले, मिरचीचे वाटण आणि मीठ घाला.
कोथिंबीर (किंवा कांदापात वगैरे) आणि डाळीचे पीठ घालून मिक्स करा.
आता थोडी थोडी करून अंदाज घेत, मावेल तेवढी कणिक घाला.
पराठे लाटता येतील एवढा घट्ट गोळा करा.
शेवटी हातावर थोडेसे तेल घेऊन गोळा सारखा करून घ्या.
कणकेचा हवा तेवढा गोळा घेऊन लाटी करा.
कोरड्या कणकेवर, साधारण पुरीएवढी जाड पोळी लाटा.
घड्या घालण्याची आवश्यकता नाही.
तापलेल्या तव्यावर पराठे खमंग भाजून घ्या.
भाजताना पराठे तेल लावून भाजा.
4 – 5 माणसांना इतके पराठे पोटभर होतात.

नुसती कोथिंबीर घालण्याएवजी, चवीत बदल म्हणून किसलेले गाजर, कोबी, पिळून काढून दुधीभोपळा, बारीक चिरलेला पालक इ. काहीतरी किंवा थोड्या थोड्या सगळ्या भाज्या घालूनही पराठे छान लागतात.
दिसायला रंगीत आणि पौष्टिक असे पराठे मुलेही आवडीने खातात.
चवीप्रमाणे आणि पराठे किती हवे आहेत, त्याप्रमाणात भाज्या आणि बटाटे घ्या.

Leave a Reply