दहीवडे (आप्पेपात्रात)

Dahi Vada Recipe – Healthy Dahi Bhalle Recipe in Appe Maker

dahi vade, dahi bhalle, नाश्ता, चटकमटक, appepan, healthy recipe, zesty flavours

गेले 8 – 10 दिवस नेदरलँडमध्ये, मुंबईची आठवण यावी असे हवामान आहे. दमट उकाडा आणि घामाच्या धारा. अश्या वातावरणात थंडगार, आंबटगोड पदार्थ खावेसे वाटतात. दहीवडा हा असाच एक पदार्थ. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा. चारीठाव जेवण असो किंवा अगदी फक्त खिचडी, पुलाव केला तरी त्याबरोबर साईडडिश म्हणून दहीवड्याची सुरेख जोडी जमते.

दहीवडा 2 – 3 प्रकारे करता येतो. सहसा आपण बाहेर खातो तो दहीवडा, चाट प्रकारात येतो. तिखट, गोड चटण्या – शेव वगैरे घातलेला. तसेच आंबट गोड दह्यात जिरं पूड, चाट मसाला, लाल तिखट असे कोरडे मसाले घालून केलेला दहीवडाही तितकाच आवडीने खाल्ला जातो. पण घरगुती पद्धतीने दहीवडा करताना अनेकजण वरून तूप, जिरं, सुक्या मिरच्या, कढीपत्ता घालून दह्याला चरचरीत फोडणी देतात. लहान असताना आई, आजीच्या हातचा असाच दहीवडा खायचो. मस्त लागतो.
एरवी करताना आपण वडे तेलात तळतो. पण आप्पेपात्रात केलेले वडेही तितकेच चांगले लागतात. दह्यात घातल्यावर कळतही नाही. आप्पेपात्रात तेल किती घालायच ते पूर्णपणे आपल्यावर आहे. नाॅनस्टिक असेल तर एक थेंबही तेल न घालता करता येतात आणि चांगले चमचमीत हवे असतील तर चमचा – अर्धा चमचाही घालू शकतो. कारण आप्पेपात्रात थोडे जास्त तेल घातले तरी कढईभर गरम तेलात तळण्यापेक्षा थोड्याश्या तेलात (shallow fry) परतण्याने फरक पडतोच. शिवाय एकदा तळणासाठी वापरलेले तेल परत वापरले जात नाही. आहारतज्ञांच्या मते एकदा गरम झालेले तेल वारंवार गरम करणे आरोग्याच्या दृष्टिने चांगले नाही. मग बघूया कसे करायचे ते.

साहित्य –
1 वाटी उडदाची डाळ
1 – 2 कमी तिखट हिरव्या मिरच्या
लहानसा आल्याचा तुकडा
4 – 5 वाट्या ताजे, घट्ट दही (आंबट नको)
1/2 वाटी दूध + 1/2 वाटी पाणी (आवश्यकतेप्रमाणे)
4 – 5 टे स्पून साखर
1 – 2 टी स्पून भाजलेल्या जिर्‍याची पावडर
1 टी स्पून चाट मसाला
थोडसं लाल तिखट
तेल
चवीप्रमाणे मीठ
फोडणीसाठी –
2 – 3 टे स्पून साजूक तूप
4 – 5 लाल सुक्या मिरच्या
1 टी स्पून जिरं/पावडर
थोडासा कढीपत्ता
हिंग

कृती –
उडदाची डाळ 4 – 5 तास भिजत ठेवा.
भिजल्यावर पाणी काढून टाकून, एक – दोनदा नळाखाली स्वच्छ धुवून घ्या.

एकीकडे दही सारखं करून घ्या.
दह्यात साखर, मीठ, जिरंपूड आणि चाट मसाला घालून फेटून घ्या.
दही खूप घट्ट असेल तरच थोडसं पाणी आणि दूध घालून पातळ करा.
दूध घातल्यामुळे दही पाणचट होत नाही.
मी ग्रीक योगर्ट वापरलं आहे.
दही पुरेसं पातळ नसेल तर वडे दह्यात घातल्यावर, दही शोषून घेतात आणि वड्यांच्या मानाने दही कमी पडतं.
वडे भरपूर दह्यात बुडल्याशिवाय मजा येत नाही.
दही फ्रिजमध्ये ठेवून गार करा.

आता डाळीत आलं, मिरच्या आणि मीठ घालून, कमीत कमी पाण्यात डाळ वाटून घ्या.
डाळ वाटल्यानंतर ताबडतोब वडे करायला घ्या म्हणजे वडे कमी तेल पितात.
आप्पेपात्राच्या प्रत्येक साच्यात अर्धा अर्धा टी स्पून तेल घाला.
तेल गरम झालं की साच्यात एकेक चमचा डाळीचे मिश्रण घालून झाकण ठेवा.
मंद आचेवर वडे शिजू द्या.
4 – 5 मिनिटांनी एखादा वडा उलटून बघा.
छान लाल सोनेरी झाला असेल तर सगळे वडे उलटून वरची बाजू तळून घ्या.
प्रत्येक साच्यात पुन्हा अगदी थोडसं तेल घाला.

वडे करतानाच एका पातेल्यात पाणी उकळून घ्या.
एकेक घाणा झाला की वडे गरम पाण्यात भिजवून घ्या.
माझ्याकडे इलेक्र्टिक कुकटाॅप असल्यामुळे मी ‘2’ वर गॅस चालूच ठेवला होता.
वडे पाण्यात व्यवस्थित भिजले की फुगून आकाराने मोठे होतात आणि रंगही फिक्कट होतो.
दही आतपर्यंत मुरावे म्हणून अनेकदा आपण वडे ताकात भिजवतो, पण ताकात वडे भिजायला वेळ लागतो.
अगदी लगेच खायचे असतील तर पाण्यातच भिजवा.
वडे छानपेकी मऊ झाले की पाण्यातून काढा.
एकेक वडा हलक्या हाताने दोन्ही तळहातात दाबून जास्तीचे पाणी काढून टाका.
पाणी काढल्यावर वडे दह्यात घाला आणि अलगद मिक्स करा.

छोट्या कढईत तूप गरम करा.
तूप तापले की, जिरं, हिंग, सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी करा.
तयार फोडणी दहीवड्यांवर ओता.
खायला घेण्याआधी थोडा वेळतरी वडे फ्रिजमध्ये ठेवा.
खूप छान लागतात.
खाताना वरून हवे असल्यास चवीप्रमाणे लाल तिखट, चाट मसाला, जिरंपूड भुरभुरून घ्या.

dahi vade, dahi bhalle, नाश्ता, चटकमटक, appepan, healthy recipe, zesty flavours

Leave a Reply