पंजाबी पालक पनीर – रेस्टाॅरंट स्टाईल

Restaurant Style – Punjabi Palak Paneer

punjabi palak paneer, restaurant style, paneer recipes, zesty flavours

नुसता रंगच नाही, तर खायला आणि चवीलाही एव्हरग्रीन अशी भाजी म्हणजे पालक पनीर. हिरवागार पालक आणि पांढरं शुभ्र मऊ, लुसलुशीत पनीर एकत्र केल्यावर जे भन्राट काॅम्बिनेशन समोर येतं ते म्हणजे निव्वळ अप्रतिम, शिवाय तितकचं पौष्टिकही. ए व्हिटॅमिन, प्रोटीन व कॅल्शियमचा अतिशय उत्तम स्त्रोत या भाजीद्वारे मिळू शकतो. जेवायला कोणी येणार असेल आणि विशेष आवडी निवडी माहिती नसतील तरी पालक पनीर पार्टीचा एकदम हिट फाॅर्म्युला ठरतो.

साहित्य –
2 जुड्या किंवा साधारण 400 ग्रॅम निवडलेला पालक
500 ग्रॅम पनीर
1 थोडा मोठा कांदा
1 लहान टाॅमॅटो
3 – 4 हिरव्या मिरच्या
1 इंच आल्याचा तुकडा
4 – 5 लहान किंवा 2 मोठ्या लसणीच्या पाकळ्या
1 टी स्पून जिरं
1/2 ते 1 टी स्पून लाल तिखट
1 टी स्पून धणेपूड
1/2 टी स्पून गरम मसाला
किंचितशी हळद
3 – 4 टे स्पून तेल
मीठ

कृती –
सगळ्यात आधी पनीर फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा.
पनीर थोडं शिळं असेल तर तुकडे करून गरम पाण्यात घालून ठेवा.
एका मोठ्या भांड्यात गरम, उकळते पाणी करून त्यात पालक 2 – 4 मिनिटे बुडवून ठेवा.
नंतर बाहेर काढून थंडगार पाण्यात 5 मिनिटे ठेवा आणि पूर्ण निथळून घ्या.
पालक असा ब्लांच केल्यामुळे शिजल्यानंतरही रंग हिरवाचं राहतो.
फार काळा पडत नाही.
वेळ कमी असेल तर पालक फक्त धुवून घेऊन वाटला तरी चालेल.
निथळलेला पालक आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्या.
वाटताना पाण्याएवजी अगदी थोडसं, मिक्सर फिरण्यापुरतं दूध घाला.
दूध घातल्याने भाजी छान क्रिमी होते.
आता तेल गरम करा.
तेल चांगलं तापलं की जिरं घालून फोडणी करा.
जिरं तडतडलं की कांदा घाला.
कांदा सोनेरी झाला की आलं लसूण घालून परता.
आता त्यात टाॅमॅटो, धणेपूड, हळद आणि तिखट घालून तेल सुटेपर्यंत परतत राहा.
चांगलं तेल सुटलं की त्यात पालकची प्युरी आणि वाटीभर पाणी घालून पालक घट्ट होईपर्यंत 5 – 7 मिनिटे रटरटून बारीक गॅसवर शिजवा.
शिजताना पालक कढईच्या बाहेर उडत असेल तर अर्धवट झाकण ठेवा.
पालक चांगला शिजला की त्यात मीठ आंणि गरम मसाला घाला.
पनीरचे घालून हलक्या हाताने ढवळा.
पनीर घातल्यानंतर दोन मिनिटांत गॅस बंद करून झाकण ठेवा.

तुम्हाला हवं तर भाजीत घालण्याआधी पनीर तेलावर परतून घ्या.
पण खाना खजानाच्या एका एपिसोडमध्ये संजीव कपूरने सांगितलं होतं की तुम्हाला पनीरचा खरा, ओरिजनल स्वाद हवा असेल तर पनीर कच्चेच घाला.
आता दस्तुरखुद्द संजीव कपूरनेच दिलेली टीप आहे म्हटल्यावर काय बोलणार?🙂
वर दिलेलं पनीरचं प्रमाण जास्त वाटलं तरी घरी खाताना तेवढं लागतचं.
मुलांची, मोठ्यांची सगळ्यांची आवडती भाजी असल्याने पनीर कमी पडत नाही.
रेस्टाॅरंटमध्ये खाताना 2 – 4 तुकड्यांवर भागवावं लागतं तसं होत नाही.
एवढी भाजी 4 जणांना अगदी पोटभर होते.

Leave a Reply