मसालेदार, झणझणीत पाटवड्यांचा रस्सा

Patwadi Rassa Recipe in Marathi – How to Make Patodi Rassa

Patwadyancha Rassa, patodi rassa recipe, spicy curry, झणझणीत रस्सा रेसिपी, zesty flavours

राम राम मंडळी! गणपती बोळवल्यानंतर लईच सुनं सुनं वाटाय लागलय न्हवं का. त्यात आणि सणासुदीच ग्वाडध्वाड खाऊन जिभंला अगदी कार आल्यागत झालया. ‘खानार्‍यांचा’ तर आत्तापतुर सरावन बी सुटला आसल की वो. त्यो सुटू दे बापडा. आपुन बी करूया की झ्याक पाटोड्यांचा रस्सा. पाटोड्यांचा रस्सा म्हंजी आस्सल म्हाराष्ट्राच्या मातीतला पदार्थ. आता कुनी हेला पिठल्याच्या वड्या म्हंतेत, कुनी पाटवड्या तर कुनी पाटोड्या. नाव कंच बी आसू द्यात हेच्या नुस्त्या दर्सनानं जीभ कशी थयथया थयथया नाचाय लागती.

pawadyancha rassa, patodi rassa, झणझणीत, मसालेदार, तर्री रेसिपी, zesty flavours

काय ते गोजिरवाणं रूपडं! लालभडक रश्श्यामंदी न्हालेल्या पिवळ्या जर्द वड्या समूर आल्याव काळजात पार लाकलाक हुतया. आक्षी पिवळा धम्मक शालू नेसून लालचुटूक चोळी अंगात घालून बोर्डावर हुबी राहिलेली चंद्रा कोपरगावकरीनच जनू. कराव्या का मंग आता? तर पयल्यांदा त्यासाटनं काय काय घ्या लागतय ते सांगते.

साहित्य –
वड्यांसाठी –
1 वाटी बेसन पीठ
1 वाटी पाणी
1 – 2 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरं
हिंग, हळद आणि मीठ
1 टी स्पून लसूण आणि मिरचीची पेस्ट (ऐच्छिक)

रश्श्यासाठी –
2 मोठे कांदे
1 टाॅमॅटो
मोठ्या लसूण पाकळ्या 5 – 6
1 इंच आल्याचा तुकडा
2 टे स्पून सुक्या खोबर्‍याचा किस
5 — 6 सुक्या मिरच्या
1 टी स्पून तीळ
1 टी स्पून खसखस
1 – 2 टी स्पून लाल तिखट
1 – 2 तमालपत्र
थोडीशी कोथिंबीर
1 टे स्पून गरम मसाला,काळा मसाला किंवा कोकणी/मालवणी मसाला
(तुम्ही घरी वापरत असाल तो कोणताही तिखट मसाला)
1/2 वाटी तरी तेल
चवीप्रमाणे मीठ

कृती –
कढईत तेल गरम करा.
तेल तापलं की जिरं, हिंग आणि हळद घालून फोडणी करा.
हवी असल्यास आलं – लसूण पेस्ट घालून परता.
आता फोडणीत डाळीचं पीठ घालून थोडसं परता.
पीठात मीठ आणि पाणी घाला.
व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवर झाकण ठेवून दोन वाफा घ्या.
बेसन पीठ आणि पाणी एकत्र कालवून फोडणीत ओतण्यापेक्षा हे जास्त खमंग लागतं.
तयार घट्ट पिठलं हाताला सोसेल इतपत गार झाल्यावर तेल लावलेल्या ताटात एकसारखं थापून घ्या.
थंड झाल्यावर वड्या पाडा.

आता रस्स्याची तयारी करू.
कांदा उभा पातळ चिरून घ्या.
आलं आणि लसणीचे तुकडे करा.
कढईत सुके खोबरे, खसखस आणि तीळ खमंग भाजून घ्पा आणि मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवा.
आता कढईत 1 – 2 चमचे तेल गरम करून कांदा, आलं – लसुण, सुक्या मिरच्या आणि तमालपत्र खरपुस, लाल होईपर्यंत परतून घ्या आणि हा मसालाही मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या.
पूर्ण थंड झाला कि टाॅमेटो आणि मूठभर कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्या.
वाटताना लागल्यास थोडसं पाणी घाला, म्हणजे गंधासारखी गुळगुळीत पेस्ट होईल.
आता कढईत अर्धी वाटी तेल गरम करा.
तेल चांगल तापलं कि वाटण घालून खूप परता.
झाकण ठेवून, मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतत रहा.
ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची.
परतत असताना त्यात गरम मसाला आणि लाल तिखट घाला.
व्यवस्थित परतून झाला कि रस्सा जेवढा घट्ट किंवा पातळ हवा असेल तसं 2 – 3 वाट्या पाणी घाला.
मीठ घालून चांगलं उकळा.
सगळ्यात शेवटी वड्या घाला.
कोथिंबीर घालून गरम गरम खायला घ्या.

रस्सा रटरटतोय तवर एकीकडे चुलीवर चार भाकर्‍या टाका. आं! काय? चूल न्हाई म्हनता. भागवा मग ग्यासवरच. आता आनी काय? भाकर बी न्हाई म्हनता. आरारारा! हे काय खरं न्हवं. चपाती नायतर भात तरी आसल न्हव का. घ्या मंग तोच. कांदा, लिंबू चिराय इसरू नगा. झालं की वो. उटा आता. ठेवा त्यो मोबाईल खाली आणि जावा की सैपाकघरात.

Leave a Reply