अस्सल गावरान चवीची वांगं – बटाटा भाजी

Delicious Spicy Brinjal Potato Curry – Eggplant Potato Curry

वांग्याची भाजी म्हटली की साधारण दोन गट पडतात. काही जणांना वांग्याची भाजी खूप म्हणजे खूप प्रिय असते. तर दुसर्‍या गटात वांग्याचे नाव काढले तरी नाक मुरडणारे असतात. वांगी जशी अनेक प्रकारची मिळतात तसेच वांग्याच्या भाजीचेसुद्धा वेगवेगळे प्रकार आपण करतोच. विदर्भातल्या लग्नात केल्या जाणार्‍या भरपूर तेल घातलेल्या वांग्याच्या भाजीबद्दल बरंच ऐकलं आहे. वांग्याचे छोटी काटेरी वांगी, मध्यम आकाराची नेहमीची वांगी, बारीक, निमुळती, काकडीसारखी लांबट हिरवी, जांभळी वांगी, भरताची वांगी असे बरेच प्रकार बघायला मिळतात. इंटरनेटवर पांढर्‍या वांग्यांचा फोटो बघितला आहे, पण प्रत्यक्षात काही तशी वांगी बघण्याचा योग आलेला नाही. कृष्णाकाठची वांगी हा वांग्यांमधला सगळ्यात ग्लॅमरस प्रकार आहे. पण मुळात माझं सांगली किंवा त्याभागात कधीच जाणं झालं नाहीये. आम्ही उल्हास नदीच्या काठावरची माणसं.🙂

वांग्याचा रस्सा, भरली वांगी, भरीत, वांग्याचे काप असे प्रकार करताना बर्‍यापेकी तयारी आणि वेळ लागतो. पण ही रेसिपी एकदम झटपट होणारी आहे. माझ्याकडे सध्या जे लाल तिखट आहे ते भन्राट तिखट आहे. एकदम hot and spicy. मी तिखटाचे जे प्रमाण दिले आहे त्या प्रमाणाने ही भाजी नाकातोंडातून जाळ काढणारी होते. पट्टीचे तिखट खाणारेच खाऊ शकतील अशी. माझा नवरा त्या कॅटेगरीत येतो. मला आणि मुलींना एवढं तिखट झेपत नाही. आम्ही दही घालून खाल्ली. पण नुस्ती पोळीबरोबर खाताना कोणतीही भाजी जेवढी तिखट लागते तेवढी भाताबरोबर लागत नाही. साधं वरण – भात किंवा दही भाताबरोबर खाल्ली तर मस्त लागते चवीला. खूप तिखटही लागत नाही.

साहित्य –
2 मोठी भरताची वांगी
2 मध्यम बटाटे
1/4 वाटी तेल
फोडणीसाठी – मोहरी, हिंग, हळद
1/4 वाटी दाण्याचं कूट
1 टे स्पून लाल तिखट
2 टे स्पून गूळ
थोडासा कढीपत्ता (ऐच्छिक)
मीठ

spicy curry, stew recipe, brinjal, eggplant, vangi batatyachi bhaaji, zesty flavours

कृती –
वांगी आणि बटाट्याच्या फोडी करा.
एका कढईत तेल तापवून खमंग फोडणी करा.
फोडणीतच तिखट घाला.
थोsडासा ठसका लागेल, एक्झाॅस्ट चालू ठेवायला अजिबात विसरू नका.
तिखट जळू न देता पटकन वांगी बटाट्याच्या फोडी घालून मिक्स करा.
झाकण ठेवून मंद गॅसवर भाजी शिजवा.
लगेच भाजीत पाणी घालू नका, कढईवर पाण्याचे झाकण ठेवा.
5 मिनिटे अंगच्या वाफेवर भाजी शिजू दे.
नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून भाजी शिजवा.
शिजत आली की दाण्याचं कूट, गूळ आणि मीठ घाला.
गूळ आणि मीठ घातल्यावर भाजीला रस सुटतोच.
त्याअंदाजाने अंगाबरोबर रस राहील इतपत पाणी घालून भाजी पूर्ण शिजवा.
झाल्यावर वरून कोथिंबीर घाला.

मला इकडे लोकल ग्रोसरी स्टोरमध्ये फक्त भरताचीच वांगी मिळतात.
ती खूपच कोवळी आणि अजिबात बिया नसलेली असतात.
पण मला वाटतं कोणत्याही प्रकारची वांगी या भाजीकरता वापरता येतील.
तसेच अर्थातच आवडीप्रमाणे कांदा, टाॅमॅटो, आलं – लसूण घालून वेगवेगळी व्हर्जन्स करता येतील.

Leave a Reply