पौष्टिक शेंगदाणे खजूर लाडू

Protein Rich Peanuts and Dates Energy Balls – No Cook Recipe

peanuts, dates, jagerry, ladoo recipe, protein laddu, healthy laddu, no cook desserts, sugar free desserts, zesty flavours

शेंगदाण्याचे गूळ आणि खजूर घालून केलेले खमंग लाडू म्हणजे हल्लीच्या भाषेत शुगर फ्री आणि नो कुक प्रकारचे. अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारे. Iron deficiency म्हणजेच लोहाची कमतरता असणार्‍यांसाठी मस्त आणि गोड गोड उपाय म्हणजे खजूर आणि गूळ. शिवाय खजूरात असलेली साखर नैसर्गिक असल्यामुळे ती आपल्या नेहमीच्या पांढर्‍या रिफाइंड साखरेसारखी अपायकारक नसते. या संदर्भात एक गोष्ट मला आवर्जून सांगाविशी वाटते. आहारतज्ञ मालती कारवारकरांची जवळ जवळ सगळी पुस्तके मी वाचली आहेत. त्यांनी सकस आहाराचे काही अगदी सोप्पे नियम सांगितले आहेत. सामान्यत: एखादा पदार्थ खाताना आपण पटकन त्यातल्या कॅलरीजचा विचार करतो. पण प्रत्येक वेळेस तसे न करता पदार्थाचे गुणधर्म पाहणेही तितकेच महत्त्वाचे असते. एकवेळ कॅलरीज थोड्याशा जास्त असल्यातरी चालतील पण पदार्थ नैसर्गिक असेल तर तो जास्त पौष्टिक आणि सकस असतो. उदा – रिफाइंड तेलाऐवजी शेंगदाण्याचे किंवा तीळाचे तेल, साध्या साखरेपेक्षा गूळ किंवा खजूर, तसेच आंबा केळी यासारखी फळे. प्रमाणात खाल्ल्यास असा सत्वयुक्त आहार नक्कीच अंगी लागतो. म्हणूनच असे शेंगदाण्याच्या, तीळाच्या लाडूसारखे एनर्जी देणारे पारंपारिक पदार्थ उपासाला किंवा थंडीच्या दिवसात खाण्याची आपली पद्धत आहे.

साहित्य –
2 वाट्या शेंगदाणे
1 वाटी गूळ
1 वाटी खजुराचे तुकडे
1 टी स्पून वेलची पावडर

कृती –
शेंगदाणे अगदी खमंग भाजून घ्या.
सालं काढून बारीक कूट करा.
गूळही बारीक चिरून घ्या.
खजूर बियांसकट असेल तर बिया काढून, धुवून तुकडे करा.
असे तुकडे केलेला खजूर वाटीभर घ्या.
आता दाण्याचं कूट, गूळ आणि खजूर मिक्स करा.
थोडं थोडं मिश्रण घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
म्हणजे शेंगदाण्याचं तेल सुटून मिश्रण छान एकजीव होईल.
आता त्यात वेलची पावडर घालून मिक्स करा.
परत एकदा हलक्या हाताने मळून घ्या आणि लहान लहान लाडू वळा.

शेंगदाणे भाजण्याआधी, स्टीलच्या चाळणीत घेऊन नळाखाली भाजी धुतो तसे धुऊन घ्या.
पाणी पूर्ण निथळले की ओले असतानाच शेंगदाणे भाजायला घ्या.
अश्या पद्धतीने भाजलेले शेंगदाणे अतिशय खमंग आणि हलके होतात.
आवडत असेल तर शेंगदाण्याची सालं काढली नाही तरी चालेल.
लाडू करताना गुळाऐवजी पूर्ण खजूरही घेता येईल.
पण गूळाने जी एक प्रकारची खमंग चव लाडूला येते ती फक्त खजुराने येणार नाही.

Leave a Reply