बटाटा आणि मटारचे खमंग पॅटीस

Cheesy Potato Green Peas Patties Recipe

रेणुकाच्या इंटरनॅशनल मैत्रिणींसाठी आधी काॅर्न चीज बाॅल्सचा बेत ठरला होता. पण आयत्या वेळेस पावसामुळे काॅर्न आणायला बाहेर जाणं झालं नाही. कंटाळाच आला होता आणि स्वीट काॅर्न सोडून बाकी सगळं साहित्य घरी होतं. फ्रोजन मटारची 1 – 2 पाकिटं मी कायमचं फ्रिजमध्ये ठेवतेच ठेवते. विशेषत: भारताबाहेर असताना. परदेशात असताना मटारसाठी सिझन वगैरे बघायचा प्रश्नच येत नाही. भारतातही हल्ली वर्षभर हवे तेव्हा फ्रोजन मटार अगदी सहज मिळत असले तरी सिझनची अपूर्वाई असतेच.

Potato, green peas, cheesy patties, spicy snacks, cheese recipes, zesty flavours

मटार हाताशी असल्यामुळे मग पॅटीजचं ठरलं. 100% भारतीय पदार्थ या वेळेस नको असे लेकीने आधीच सांगितलं होतं. त्यामुळे मग पॅटीज इंडोवेस्टर्न टच देऊन केले. गरमागरम पॅटीज मुलींनी ताव मारून खाल्ले.

जास्त प्रमाणात करायचे होते म्हणून मी तळून केले. कारण शॅलो फ्राय करायला वेळ लागतो. एरवी तळून, शॅलो फ्राय करून किंवा ओव्हनमध्ये बेक करूनही करू शकता. मी पुढच्या वेळेस करताना ओव्हनमध्येच बेक करायचं ठरवलं आहे.

या पॅटीजमध्ये मसाले घालताना आलं लसणाच्या पेस्टपासून

ओरिगॅनो , मिक्स हर्ब्ज, इटालियन सिझनिंग यापैकी अक्षरश: असतील ते आणि आवडीप्रमाणे कोणतेही मसाले घालता येतात. लाल तिखट, जिरं पूड, गरम मसाला, आमचूर पावडर असं काहीही घाला, बटाटा बेस असल्यामुळे चव छानच लागते. उत्तर भारतात या पॅटीजच बारसं टिक्की या नावाने होतं. बटाट्याची पारी करून आत सारण भरूनही पॅटीज केले जातात. पण ते प्रकरण बर्‍यापैकी खटाटोपाचं आहे. त्यापेक्षा हा प्रकार कितीतरी सोप्पा आहे.
साहित्य –
4 – 5 मध्यम आकाराचे बटाटे
1 वाटी मटार (फ्रोजन किंवा ताजे)
1 वाटी भरून किसलेलं चीज
2 – 3 लसूण पाकळ्या
अगदी लहानसा आल्याचा तुकडा
1 टी स्पून चाट मसाला
1 टी स्पून मिरपूड
4 टे स्पून काॅर्न फ्लोर/ब्रेड क्रम्ज/मैदा/तांदळाचं पीठ/भाजलेला रवा
मीठ ( चीजच्या अंदाजाने)
आवश्यकतेप्रमाणे तेल

कृती –
बटाटे मऊ उकडून घ्या.
ताजे असल्यास मटारही उकडून घ्या.
बटाटे आणि मटार पाणी निथळून पूर्ण गार आणि कोरडे होऊ द्या.
बटाटे गार झाल्यावर मोठ्या बाऊलमध्ये सालं काढून कुस्करून घ्या.
मटार मिक्सरमध्ये ओबडधोबड फिरवून घ्या.
बटाटे, मटार आणि आलं लसणाची पेस्ट एकत्र मिक्स करा.
आता त्यात सगळे कोरडे मसाले घाला.
वर दिलेल्या बाइंडिंगच्या साहित्यापैकी जे घालणार असाल ते पीठ घाला आणि मिक्स करा.
तरीही मिश्रण चिकट लागत असेल तर 2 – 3 चमचे आणखी पीठ घाला.
सगळ्यात शेवटी मीठ आणि किसलेलं चीज घालून हलक्या हाताने मिक्स करा.
मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून चपट्या पॅटीज वळून घ्या.
गरम तेलात तळा किंवा तव्यावर शॅलो फ्राय करा.
चटणी, केचप किंवा कोणत्याही आवडत्या ड्रेसिंगबरोबर सर्व्ह करा.

potato, green peas, cheesy patties, starter, appetizers, zesty flavours

Leave a Reply