सुक्या खोबर्‍याच्या खुसखुशीत करंज्या

Sukhe Nariyal Ke Stuffingwali Gujiya Recipe – Sweet Gujiya Recipe in Marathi

दिवाळीच्या फराळात सगळ्यात ग्लॅमरस पदार्थ असतो तो म्हणजे चकली. बिचार्‍या करंजीला काही भावच नसतो. पण आमच्याकडे माझ्या धाकट्या कन्येला करंज्या बर्‍यापैकी प्रिय आहेत. अर्थातच त्या हव्या तश्या झाल्यातरच. बिस्किटासारखी खुसखुशीत पारी आणि गच्च भरलेलं खमंग सारण. नो खुळखुळा🙂 एरवी आपण करंज्यांचे सारण करताना पिठीसाखर वापरतो. पण यावेळेस मी रेडिमेड गुळाची पावडर माझ्याकडे होती ती घातली. त्यामुळे चवीत बदल होऊन सारण मस्त खमंग झालं. या पद्धतीने करंज्या खूपच छान होतात.

Gujiya Recipe, karanji recipe, sukya khobryachi karanji, zesty flavours, diwali sweets

साहित्य –

पारीसाठी-

2 वाट्या कणिक किंवा मैदा
1/4 वाटी तेल किंवा तूप
पीठ भिजवण्यासाठी दूध/दूध+पाणी

सारणासाठी-
2 वाट्या किसलेलं सुकं खोबरं किंवा तयार डेसिकेटेड कोकोनट
2 वाट्या गूळ पावडर किंवा पिठीसाखर
2 टे स्पून खसखस
1/4 ते 1/2 वाटी मिल्क पावडर (ऐच्छिक)
1/4 वाटी मिळून काजू, बदाम, पिस्त्याची पावडर
वेलची पूड
तळण्यासाठी तेल किंवा तूप

कृती –
कणकेत 1/4 वाटी गार तेलाचे मोहन घालून मिक्स करा.
मोहन कडकडीत नसले तरी चालेल.
पूर्ण दुधाने किंवा दूध आणि पाणी अर्धे अर्धे घेऊन कणिक घट्ट भिजवा.
भिजवलेली कणिक 1 – 2 तास झाकून ठेवा.

सारणासाठी आधी खसखस छान खमंग भाजून घेऊन वाटीत काढून ठेवा.
आता कढईत खोबरं मंद आचेवर भाजून घ्या.
खोबरं भाजून होत आल्यावर त्यात सुकामेवा घालून थोडसं भाजून गॅस बंद करा.
खसखस मिसळून मिश्रण गार होऊ द्या.
अगदी पूर्ण गार झाल्यावर गूळ/साखर, चवीप्रमाणे वेलची पूड घालून मिक्स करा.
मिल्क पावडर वापरणार असल्यास तिही घाला.
आता भिजवलेली कणिक चांगली मळून घ्या.
छान मऊ लुसलुशीत करा.
कुटण्याची आवश्यकता नाही.
वाटल्यास फूड प्रोसेसरमधून काढून घ्या.
तयार पीठाच्या छोट्या छोट्या पुर्‍या लाटा.
या पुर्‍या खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अश्या लाटा.
करंजी हाताळताना फाटणार नाहीत इतपत जाड ठेवा.
करंज्या आकाराने लहानच करा.
खूप मोठी फताडी करंजी दिसायलाही बेढब दिसते शिवाय बघूनच खायची इच्छा होत नाही.
पारीमध्ये साधारण 1 ते 11/2 टे स्पून भरून सारण घाला.
करंजी गच्च भरलेली हवी.
आता पारीचा वरचा भाग खाली दुमडून करंजी बंद करा.
दोन्ही कडा बोटांनी घट्ट दाबून घ्या.
दाबताना किंचीत खेचून घ्या.
कातण्याने कापून करंजीला आकार द्या.
मुरड घालता येत असेल तर काम जास्त सोपे होते.
करंज्या मस्त पॅक होऊन दिसायलाही छान दिसतात.
शिवाय फाटतही नाहीत.
करंज्या भरताना नॅपकिन किंवा पेपर टाॅवेल ओला करून घट्ट पिळून तयार करंज्या झाकून ठेवा.
तेल किंवा तूप व्यवस्थित गरम झाले की गॅस कमी करा.
थोड्या थोड्या करंज्या झाल्या की मध्यम आचेवर सावकाश तळून घ्या म्हणजे एकदम खुसखुशीत होतील.

Leave a Reply