गुलाबजाम आणि प्रीमिक्स रेसिपी – खवा न घालता, सोपी रेसिपी

Easy Gulabjamun Recipe With Homemade Premix

Homemade gulabjamun, gulabjamun premix, mithai, dessert, easy gulabjamun, zesty flavours, no mawa

खव्याचे गुलाबजाम ही डेलिकसी असली तरी विशेषत: परदेशात राहणार्‍या मंडळींना खवावगैरे मिळणं शक्यच नसतं. प्रीमिक्सची पाकिटं सगळीकडे मिळतात. पण आता तेही विकत आणायची गरज नाही. मी जसं याआधीही लिहलं होतं मिल्क पावडर ही एकच वस्तू हाताशी असेल तर वेगवेगळ्या प्रकारची पक्वान्ने, गोड पदार्थ हवे तेव्हा करता येतात. मिल्क पावडर, साखर आणि तेल या गोष्टी जगाच्या पाठीवर कुठेही सहज मिळतात. म्हणजे तुमच्या राहत्या ठिकाणी लोकल सुपरमार्केटमध्येही तुम्हाला मिल्क पावडर, साखर आणि तेल अगदी हमखास मिळतेच. त्यासाठी इंडिअन स्टोरमध्ये जाण्याची किंवा आॅर्डर करण्याची गरजच उरत नाही. पटकन कधीही मनात येईल त्यावेळेस गुलाबजाम रेडी. त्यामुळे यावेळी दिवाळीच्या मेन्यूमध्ये गुलाबजाम नक्की अॅड कराच आणि सांगा मला कसे झाले होते ते.

प्रीमिक्ससाठी –
1 वाटी मिल्कपावडर
1/3 वाटी मैदा किंवा कणिक(1/2 वाटीपेक्षा थोडासा कमी)
1 टी स्पून बेकिंग पावडर
1/4 टी स्पून सोडा

कृती –
वर दिलेले सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करा.
प्रीमिक्स तयार.
गुलाबजाम लगेच करायचे नसतील तर रेडी मिक्स एअर टाइट डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवून द्या. नंतर हवे तेव्हा करा.
वरील साहित्यात साधारण विकतच्या एका पॅकेटएवढे (200 ग्रॅम) मिक्स तयार होते.
ज्यात मध्यम आकाराचे तीसेक गुलाबजाम होतात.

गुलाबजाम (साहित्य) –
वर दिलेल्या प्रमाणात प्रीमिक्स पावडर
6 – 7 टे स्पून दूध
थोडसं तूप
तळण्यासाठी तेल
2 वाट्या साखर
3 वाट्या पाणी
वेलची पावडर
केशर
गुलाब किंवा केवडा पाणी/इसेन्स आवडीप्रमाणे

कृती –
प्रीमिक्स पावडर एका बाऊलमध्ये घेऊन त्यात लागेल तसं थोडं थोडं दूध घालून अगदी मऊ कणिक भिजवा.
थोडावेळ झाकून ठेवा.
पाक करण्यासाठी अगदी मोठ्ठ भांडं घ्या.
गुलाबजाम तळताना, तसेच पाकात मुरल्यावर आकाराने जवळजवळ तिप्पट होतात.
त्यामुळे गुलाबजाम फुलून, पाकात पूर्ण बुडतील असं भांडं घ्या.
साखरेत पाणी घालून पाक करायला ठेवा.
साखर विरघळून सणसणीत उकळी आली की दोन मिनिटांत गॅस बंद करा.
पाक घट्ट झाला तर गुलाबजाममध्ये व्यवस्थित शिरणार नाही.
गुलाबजामचा कच्चा पाक करायला सगळ्यात सोप्पा आहे.
पाक पातळच करायचा असल्याने तार येण्याची वगैरे भानगड नाही.
तयार पाकात चवीप्रमाणे वेलची पावडर, केशर, गुलाबपाणी घालून ढवळून घ्या.
एकीकडे कढईत तेल तापत ठेवा.
हातावर अगदी थोडसं तूप घेऊन पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्या.
ह्या पीठाचे गुळगुळीत, भेगा पडू न देता मोठ्या सुपारीएवढे गोळे करा.
गुलाबजाम करताना सगळे गुलाबजाम करून होईपर्यंत पीठ सतत मळत राहा.
गोळे करतानाही प्रत्येक वेळेस जेवढा गोळा करायचा आहे तेवढं पीठ हातात घेऊन मळून मग गोळा करा.
थोडा जास्त वेळ लागला तरी गुलाबजाम अगदी छानच होतात.
तेल व्यवस्थित तापलं की गॅस अगदी मंद करा.
आधी छोटाशी गोळी तेलात टाकून बघा.
टाकल्यानंतर काही सेकंदांनी गोळी तेलावर आली पाहिजे, म्हणजे तेल योग्य प्रमाणात तापले आहे.
आता तुमच्या तळणीच्या आकाराप्रमाणे गोळे तळायला घ्या.
सावकाश पण डार्क रंग येईपर्यंत गुलाबजाम तळून घ्या.
एकेक घाणा झाली की पेपर टाॅवेलवर काढून घ्या.
दुसरी बॅच तळून झाली की आधीचे पेपर टाॅवेलवरचे गुलाबजाम पाकात टाकत चला.
म्हणजे पाक तेलकट होणार नाही.
तळताना तेल थोडे गार झाले तर तेल आवश्यक तेवढे तापवून मग परत गॅस कमी करा.
सगळे गुलाबजाम करून पाकात टाकल्यावर पाकासकट 2 – 4 मिनिटे गरम करा.
5 – 6 तास मुरल्यावर खायला घ्या.
घाई असेल तर निदान 1 – 2 तास तरी मुरू द्या.

2 thoughts on “गुलाबजाम आणि प्रीमिक्स रेसिपी – खवा न घालता, सोपी रेसिपी

  1. ह्यावर्षीचे दिवाळीचे गुलाबजाम खाताना तुझे नाव घेणार आणि मगच खाणार .👌👌👌

Leave a Reply