बनाना ब्रेड (एगलेस) रेसिपी

 Super Spongy Eggless Banana Bread Recipe

Banana Bread, Eggless Cake, Wholewheat, Sweets, Kids Menu, Zesty Flavour

आज खूप दिवसांनी ब्लाॅगवर डोकावत्येय. सध्या शाळेमुळे वेळ तसा कमीच मिळतो. शाळा जरी अगदी थोडावेळ असली तरी एकप्रकारे रूटीन असलं की कसं वेळेत बांधल्यासारखं होतं. त्यामुळे कधी काही केलं तरी पटकन करा आणि खाऊन मोकळे व्हा असा प्रकार होतो. कारण ब्लाॅगवर रेसिपी शेअर करायची असते तेव्हा कसा हाताशी भरपूर वेळ आणि अगदी शांतपणा लागतो. फोटोसेशन, रेसिपी लिहिणे हे सगळे सोपस्कार सावकाशपणेच करावे लागतात. पण आता ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि लाॅकडाउनमुळे 19 तारखेपर्यंत घरीच राहायचे असल्यामुळे पुन्हा वेळच वेळ.

आजची रेसिपी आहे बनाना ब्रेडची. घरी केळी आणली की शेवटची 2 – 3 केळी नेहमी जास्त पिकतात आणि बर्‍याचदा टाकून द्यायची वेळ येते. बनाना ब्रेडसाठी अशी जास्त पिकलेलीच केळी लागतात.

साहित्य –
3 – 4 मध्यम आकाराची जास्त पिकलेली केळी
11/2 कप मैदा किंवा कणिक
1/2 कप तेल (चव आणि वास नसलेले)
1/2 कप ब्राऊन किंवा साधी साखर
1 टी स्पून बेकिंग पावडर
1/2 टी स्पून बेकिंग सोडा
1 टी स्पून व्हॅनिला इसेन्स किंवा 1/2 टी स्पून व्हॅनिला पावडर
2 टे स्पून चाॅकलेट पावडर (ऐच्छिक)
1/4 टी स्पून दालचिनी पावडर (ऐच्छिक)

कृती –
20cm x 11cmच्या लोफ टीनला तेल आणि पीठ लावून ग्रीस करा.
हवातर बटर पेपर लावा.
ओव्हन 180 डिग्री सें.ला 15 मिनिटे प्रीहीट करायला लावा.
केळी, साखर आणि तेल मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
तयार प्युरी एका मोठ्या बाऊलमध्ये काढा.
आता त्यात मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा चाळून घाला.
हवी तर चाॅकलेट पावडर आणि दालचिनी पावडर घाला.
व्हॅनिला इसेन्स घालून हलक्या हाताने मिक्स करा.
हे मिश्रण तयार लोफ पॅनध्ये ओता.
पॅन हळूच ओट्यावर आपटून हवेचे बुडबुडे काढून टाका.
ब्रेड ओव्हनमध्ये 60 मिनिटे बेक करा.
जास्त पिकलेली केळी बर्‍यापैकी ओलसर असतात. त्यामुळे हा ब्रेड बेक व्हायला वेळ लागतो.
पण केळ्यांच्या आकाराप्रमाणे, किती पिकली आहेत त्याप्रमाणे 5 – 10 मिनिटे कमी जास्त लागू शकतात.
40 – 45 मिनिटांनंतर चेक करत राहा.
केकच्या बरोबर मध्ये टूथपिक घालून क्लीअर येईपर्यंत बेक करा.
कोणताही केक किंवा ब्रेड मधून बेक व्हायला जास्त वेळ लागतो.
बनाना ब्रेडला तर लागतोच.
जर वरून ब्रेड जास्त होतो आहे (करपतो आहे) आणि मध्ये कच्चा आहे असं वाटलं तर अॅल्युमिनियम फाॅईलने पॅन वरून झाका आणि मग पूर्ण बेक करा.
म्हणजे व्यवस्थित होतो.

केक, कुकीज, ब्रेड असे पदार्थ घरी करताना मैदा किंवा कणिक आवडीप्रमाणे वापरू शकता. फारसा फरक पडत नाही. फक्त कणकेचे पदार्थ मैद्यापेक्षा किंचीत जड (dense) होतात एवढच.
बेकिंग करताना शक्यतो मेजरिंग कपस् आणि स्पून्स वापरा. हे हल्ली अगदी कुठेही सहज मिळतात. त्यामुळे काहीच प्रश्न नाही.
अगदी बेसिक केक घरगुती पद्धतीने करताना वाटी वापरली तरी चालेल. वाटीने पीठ घेताना सपाट वाटी पीठ घ्या.

Banana Bread, Eggless Cake, Wholewheat Cake, Kids Friendly Menu, Zesty Flavours

Leave a Reply