ट्रॅडिशनल चायनीज व्हेज डम्पलिंग्ज रेसिपी

Traditional Chinese Veg Dumplings Recipe

Dumplings Recipe, Chinese Food, Veg Dumplings, Healthy Meals, Steamed Food, Zesty Flavours

अर्थात तिखट मोदक किंवा करंज्या. आजची रेसिपी मी केली नाहीये. माझं काम फक्त फोटो काढणे आणि रेसिपी टाइपणे एवढच होतं. आजच्या रेसिपीच संपूर्ण क्रेडिट आमच्या ‘मिस शेफ’च आहे. डम्पलिंग्ज म्हणजेच मोमोज. चायनीज डम्पलिंग्ज तिबेट, नेपाळ फिरून भारतात येईपर्यंत त्याचे मोमोज झाले असतात. ज्यांना खूप उग्र चवीचं खायला आवडत नाही त्यांना हे डम्पलिंग्ज नक्की आवडतील. सगळ्या चायनीज पदार्थांची खासियत म्हणजे भाज्यांचा भरपूर वापर आणि तोही भाज्यांची मूळ चव न बिघडवता. एक थेंबही तेल न वापरता डम्पलिंग्ज करता येतात. उकडलेले किंवा वाफवलेले असल्यामुळे अगदी हेल्दी पदार्थ आहे हा. उकडल्यावर डम्पलिंग्ज खूप फुगतात. आकाराने थोडे मोठे केले तर दोन – तीन खाल्ले तरी व्यवस्थित पोट भरतं. अर्थात हे प्रत्येकाच्या खाण्याच्या कपॅसिटीवर आहे. तुम्हाला खूप उत्साह असेल तर अगदी छोटे छोटे बाइट साईजचेही करू शकता.

यू ट्युबवरचा एक शो बघून मनालीने हे डम्पलिंग्ज केले. ज्यात काही स्पर्धक रेसिपीशिवाय एखादा पदार्थ करतात आणि शेजारच्या किचनमध्ये एक प्रोफेशनल शेफ तो पदार्थ करून दाखवतो. असा काहीतरी शो आहे तो.
खूप छान झाले होते चवीला.

साहित्य –
3 – 4 वाट्या मैदा किंवा कणिक
2 टी स्पून ड्राय इंस्टंट यीस्ट
चवीला मीठ

सारणासाठी –
3 – 4 मध्यम आकाराची गाजरं
3 – 4 पातीसकट कांदे
2 वाट्या उकडलेले मटार
2 वाट्या किसलेलं चीज
आल्याचा तुकडा
मीठ

कृती –
कणकेत यीस्ट घालून फुलक्यांना भिजवतो तितकी घट्ट भिजवा.
भिजवलेली कणिक व्यवस्थित झाकून कमीत कमी एक ते दोन तास फ्रिजमध्ये ठेवा.
सारणासाठी गाजर अगदी बारीक चिरा किंवा मोठ्या किसणीने किसून घ्या.
कांदापातही बारीक चिरा.
बाउलमध्ये चिरलेल्या भाज्या आणि मटार एकत्र करा.
त्यात आलं किसून घाला.
चीज आणि मीठ घालून मिक्स करा.
सारण अगदी आयत्या वेळेस करा म्हणजे मीठाचं पाणी सुटणार नाही.
आता फ्रिजमधून कणिक बाहेर काढा.
कणिक पर्फेक्ट झाली आहे हे ओळखण्याची खूण म्हणजे बोटाने दाबले असता कणकेत खड्डा पडला पाहिजे आणि तो लगेच पुन्हा वर आला पाहिजे.
तसेच कणकेचा गोळा सुरीने उभा कापल्यावर त्याला ब्रेडसारखी जाळी पडलेली दिसते.

Veg Dumplings, Mix Veg Stuffing, Fermented Dough, Zesty Flavours
आता ह्या कणकेचा एकेक गोळा घेऊन त्याच्या लांबट वळकट्या (रोल) करा.
सुरीने ह्या वळकटीचे चिरोट्यांना कापतो तसे सारख्या आकाराचे उभे तुकडे करा.
त्याचे गोळे करून हाताने मध्ये किंचीत जाडसर आणि कडांना पातळ अशी पारी करा.
प्रत्येक पारीमध्ये एक – दोन टे स्पून सारण भरून डम्पलिंग्ज बंद करा.
कोणत्याही आवडत्या आकारात करा.
करंजी, मोदक, मध्ये चिमटा घेऊन तो डम्पलिंग्जचा टिपीकल शेप असतो तो किंवा करंजी करून मुरड घालणे, अंगठ्याने दाबून किंवा काट्याने कडांना डिझाईन करणे असे खूप प्रकार करता येतील.
सारण बाहेर न येता डम्पलिंग्ज घट्ट पॅक झाले की झालं.
एका मोठ्या पातेल्यात एकीकडे पाणी उकळायला ठेवा.
पाण्यात थोडसं तेल घाला.
म्हणजे डम्पलिंग्ज चिकटणार नाहीत.
पाण्याला चांगली उकळी आली की थोडे थोडे डम्पलिंग्ज त्यात सोडत चला.
चकचकीत दिसतील आणि हाताला चिकटणार नाहीत इतके शिजवा.
Chinese Veg Dumplings, Steaming, Cooking Method, Healthy Meal, Zesty Flavours
एक बॅच शिजली की पुढचे घाला.
गरम गरमच खा.
सिराचा, सोया साॅस आणि टाॅमेटो केचप मिक्स करून बरोबर घ्या.
मस्त लागतं एकदम.

ही रेसिपी आमच्या शेफने जशी केली होती तशी मी शेअर केली आहे.
पण मुळातच हा पदार्थ खूप व्हर्सटाइल आहे.
आवडीप्रमाणे यात असंख्य व्हेरिएशन्स करता येतील.
लसूण या रेसिपीत मस्ट आहे.
पण मनालीने नव्हता घातला.
भाज्यांचेही प्रमाण आणि प्रकार आवडीप्रमाणे बदलता येईल.
फरसबी, हिरवा किंवा जांभळा कोबी, वेगवेगळ्या रंगाच्या सिमला मिरच्या असं काहीही घालता येईल.
याशिवाय चिकन, उकडलेली अंडी, पनीर , मोड आलेले मूग असे अनेक पदार्थ वापरू शकता.
जास्त खमंग आणि वेगळी चव येण्यासाठी भाज्या आणि इतर वस्तू कढईत थोडसं तेल घालून मोठ्या आचेवर पटकन स्टर फ्राय करा.
हक्का नूडल्स किंवा फ्राइड राईससाठी करतो तसं.
उकडतानाही मोदक, अळूवड्या, इडल्या करतो तसं पातेल्यात चाळणी ठेवून, कुकरमध्ये, इडली पात्रात वाफवता येतील.
हे डम्पलिंग्ज चायनीज प्रकारच्या कोणत्याही सूपमध्ये बुडवूनसुद्धा खातात.

Leave a Reply