मकर संक्रांतीसाठी खमंग तीळ – गुळाची पोळी

Makar Sankranti Special Gud ki Roti – Sweet Flatbread Using Jaggery and Sesame Stuffing

tilgulachi poli, sweet roti, makar sankranti, sesame, jaggery, zesty flavoures

यावर्षी रथसप्तमी आॅलमोस्ट एक महिन्याने आहे. त्यामुळे तिळगुळ आणि गुळाच्या पोळ्या खायला भरपूर दिवस मिळणार आहेत. शिवाय भारतात तरी आता सगळं काही जवळजवळ नाॅर्मल असल्यामुळे महिनाभर हळदीकुंकवांची मजा आहे. तुमची गुळाची पोळी आज करून, खाऊन झाली असेलच. पण काही कारणाने आज तुम्ही केली नसेल किंवा परत करायचा बेत असेल तर ही रेसिपी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल.

साहित्य –
सारणासाठी –
1/2 कि गूळ (साधा, चिक्कीचा नको)
1/2 वाटी तीळ
1/2 वाटी बेसन पीठ
2 टे स्पून खसखस
2 टे स्पून तेल
1 – 2 टी स्पून वेलची पावडर
पारीसाठी –
4 वाट्या कणिक
1/2 वाटी तेल
1/2 वाटी मैदा (ऐच्छिक)

कृती –
कणकेत अर्धी वाटी तेल कडकडीत गरम करून घाला.
हवा असल्यास मैदा घालून कणिक मध्यम भिजवा.
खूप घट्टही नको आणि सैलही नको.

तेलात बेसन खमंग भाजून घ्या आणि गार करत ठेवा.
तीळ आणि खसखसही खमंग भाजा.
थंड झाल्यावर मिक्सरमध्ये कूट करा.
गूळ किसून घ्या किंवा बारीक चिरून घ्या.
चिरलेला गूळ मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
गूळ मस्त मऊ होतो.
गुळामध्ये तीळकूट, बेसन, वेलची पूड घालून छानपैकी मळून घ्या.

एका गुळाच्या पोळीसाठी, पोळी किती साईजची हवी आहे त्याप्रमाणात कणकेचे दोन गोळे घ्या.
कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा गुळाचा गोळा घ्या.
कणकेचा प्रत्येक गोळा दोन्ही तळहातात दाबून त्याची नेहमीसारखी लाटी करा.
तशीच गुळाचीही लाटी करा.
कणकेची एक लाटी हातावर घेऊन त्यावर गुळाची लाटी ठेवा.
वरून कणकेची दुसरी लाटी ठेवून हे सँडविच हलक्या हाताने दाबा.
आता कणकेचे दोन्ही गोळे कडेकडेने थोडेसे ओढून घ्या आणि बोटांनी घट्ट दाबून सारण एकदम मस्त पॅक करा.
कोरड्या कणकेत बुडवून पोळी लाटा.
खूप पातळ लाटू नका.
लाटताना पोळी सारखी उलटायची नाही.
फक्त शेवटी एकदा उलटून वाटल्यास थोडी सारखी करून घ्या.
तवा चांगला तापला की सुरवातीला लाटलेली बाजू वर येईल अशी पोळी तव्यावर टाका.
भाजतानाही सारखी न उलटता एकदाच परता.
गुळाची पोळी भाजायला अजिबात वेळ लागत नाही.
पटकन भाजून होते.
भाजून झाल्यावर पोळ्या एकावर एक न ठेवता पेपरवर पसरून ठेवा.
खाण्याआधी पूर्ण गार होऊ द्या.

थोडासा मैदा घातल्यामुळे पोळ्या सरसर लाटल्या जाऊन गूळ अजिबात बाहेर येत नाही.
एरवी मी घरी मुद्दाम मैद्याचं काही करत नसले तरी यावेळी लेकीच्या कृपेने मैदा घरी होता.
मग थोडासा घालायचा मोह होतोच.
कारण मनालीला बेकिंग करायला खूप आवडतं.
तिचे काही ठराविक युट्युब चॅनल्स आहेत जे ती फाॅलो करते आणि रेसिपी करताना तिला substitutes अजिबात चालत नाहीत.
जर तुम्ही तीळाचे मऊ लाडू करत असाल तर त्यातलेच चार पाच लाडू कुस्करून सारणात घाला.
त्यामुळे वेगळं तीळकूट करावं लागत नाही.

tilgulachi poli, sweet roti, makar sankrant, sesame, jaggery, zesty flavoures

One thought on “मकर संक्रांतीसाठी खमंग तीळ – गुळाची पोळी

Leave a Reply