झणझणीत लसणाचं लोणचं – तोंडाला पाणी सुटणारा प्रकार

Spicy Garlic Pickle Recipe in Marathi – Extra Hot Garlic Dressing

garlic pickle recipe, spicy pickle, extra hot pickle, garlic recipes, zesty flavours

भारतात असताना जेव्हा जेव्हा मनिष चेन्नईला जायचा तेव्हा ‘श्रीकृष्ण’चा मैसूरपाक आणणे हे ठरलेलं रूटीन होतं. ज्यांनी ज्यांनी हा मैसूर खाल्ला आहे, नुसत्या आठवणीनेच त्यांच्या तोंडाला कधीही, कुठेही पाणी सुटेल असा हा प्रकार आहे. मला तो ज्यात मिळायचा ते पांढरे, चपटे डबेपण खूप आवडायचे. या मैसूरबरोबर श्रीकृष्णमधूनच मनिषने एकदा 1 किलो लोणच्याचे एक किट आणले होते. हाही प्रकार खूप इंटरेस्टिंग होता. ज्यात वेगवेगळ्या प्रकारची दहा लोणची होती. 100 ग्रॅमच्या छोट्या छोट्या बरण्या होत्या. यात नेहमीची कैरी, हिरवी मिरची, लिंबू ही लोणची तर होतीच शिवाय आलं, कोथिंबीर, पुदिना, असे प्रकारही होते. सगळे मला आता आठवत नाहीयेत.

माझी आई असंख्य प्रकारची लोणची अगदी निगुतीने करत आली आहे. तीही किलो किलोच्या प्रमाणात. ज्या सिझनमध्ये जे जे काही मिळतं त्याच लोणच ती आत्ता आत्तापर्यंत करायची. तिचा तो छंदच आहे. या गोष्टी विकत मिळतात किंवा आणू शकतो हे त्या पिढीला मान्य करायलाच अवघड जातं. पण खरंच आहे विकतच्या लोणच्याला येणारा तो टिपीकल जुनाट वास किंवा चव तुम्हाला आवडत नसेल तर मग या पद्धतीने लोणचं नक्की करून बघा.
ताजी ताजी खमंग लोणची ज्यांना आवडतात त्यांना लोणच्याचा हा वेगळा प्रकार खूप आवडेल.

साहित्य –
1 वाटी लसणीच्या लहान पाकळ्या किंवा तुकडे
1/2 वाटी कैरी लोणचे मसाला
1/4 वाटी मीठ
1/4 वाटी लिंबाचा रस
फोडणीसाठी –
1/2 वाटी तेल
1 टीस्पून मोहरी
1 टीस्पून हळद
1/2 टीस्पून हिंग

कृती –
सगळ्यात आधी तेल चांगलं तापवून फोडणी करा.
तेल तापलं की मोहरी आणि हिंग घालून खमंग फोडणी करा.
गॅस बंद करून फोडणी थोडी गार झाली की मग हळद घाला.
म्हणजे हळद जळणार नाही.
फोडणी गार होईपर्यंत बाकीची तयारी करा.
लसणीच्या पाकळ्या लहान लहान असतील तर आख्ख्याच ठेवल्या तरी चालतील.
पण खूप मोठ्या (चायनीज) असतील तर त्याचे लहान तुकडे करा किंवा चकत्या करा.
असे तुकडे वाटीभर घ्या.
एका मोठ्या बोलमध्ये लसणाचे तुकडे, मसाला आणि मीठ घालून एकत्र करा.
लिंबाचा रस घालून मिक्स करा.
गार झालेली फोडणी त्यात ओतून परत एकदा सगळं छानपैकी मिक्स करा.
लोणच तयार.
रात्रभर किंवा एखादा दिवस लोणच मुरू द्या.
म्हणजे मस्त खार सुटेल.

Leave a Reply