परफेक्ट चवदार दाक्षिणात्य सांबार रेसिपी

Perfect Delicious South Indian Sambar Recipe

perfect sambar, authentic sambar recipes, south indian sambar, sambar masala recipe, zesty flavoures

काल मी इडलीची रेसिपी शेअर केली होती. सांबार मसालाही मी बर्‍याच दिवसांपूर्वी शेअर केला होता.

https://khadadiofficial.blogspot.com/2020/06/blog-post_24.html

सांबारची सगळी चव खासकरून मसाल्यावर अवलंबून असते. पटकन होणार्‍या आणि घरातल्याच साहित्यात होणार्‍या ह्या ताज्या मसाल्यामुळे सांबारला एकदम चार चांद लागतात. या वेळेस सांबार करताना ताजा, घरगुती मसाला घालून करा. फरक तुमच्याच लक्षात येईल.

साहित्य –
1/2 वाटी तूरडाळ
1 वाटी मटार
1 मध्यम बटाटा
1 मोठा कांदा
1 मोठा टाॅमॅटो
3 टे स्पून सांबार मसाला
1/2 वाटी खवलेला नारळ किंवा रेडिमेड डेसिकेटेड कोकोनट
1 – 2 टी स्पून चिंचेचा दाट कोळ
1 टी स्पून लाल तिखट (ऐच्छिक)
कोथिंबीर
चवीप्रमाणे मीठ
फोडणीसाठी –
2 – 3 टे स्पून तेल
मोहरी
हिंग
हळद
8 – 10 कढीपत्त्याची पानं
4 – 5 कमी तिखट सुक्या मिरच्या

कृती –
कुकरमध्ये डाळ अगदी मऊ, गरगट शिजवून घ्या.
डाळीबरोबर बटाटाही उकडून घ्या.
मटार फ्रोजन नसतील, ताजे असतील तर तेही वाफवून घ्या.
कांदा उभा, पातळ चिरा.
टाॅमॅटोही बारीक चिरून घ्या.
कढईत तेल गरम करा.
तेल चांगलं तापलं की मोहरी, हिंग घालून खमंग फोडणी करा.
फोडणीत कढीपत्ता घाला.
आता कांदा घालून चांगला सोनेरी होईपर्यंत परता.
कांदा शिजला की त्यावर टाॅमॅटो घाला.
टाॅमॅटो एकजीव होऊन पेस्ट होईपर्यंत परता.
आता त्यात हळद, तिखट आणि सांबार मसाला घालून खमंग वास येईपर्यंत खूप परता.
ह्या मिश्रणात बटाटा कुस्करून किवा फोडी करून घाला.
मटारही घाला.
दोन मिनिटे परतून झाकण ठेऊन एक वाफ घ्या.
शिजलेली डाळ चांगली घोटून घेऊन भाज्यांवर घाला.
सहा सात वाट्या पाणी घाला.
चवीप्रमाणे मीठ, चिंचेचा कोळ आणि नारळ घालून सांबार खूप उकळा.
घरभर सांबारचा तो टिपीकल घमघमाट पसरेल इतके उकळा.
झाल्यावर वरून कोथिंबीर घाला.

सांबारमध्ये शेवग्याच्या शेंगा, वांगी, भेंडी, दुधी भोपळा इ. भाज्या कितीही मस्ट असल्यातरी आमच्याकडे कांदा, बटाटा, टाॅमॅटो, मटार एवढ्यावरच सांबार होतं.
तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या फोडणीत घालून, त्यात पाणी घालून वाफवून घ्या.
मग त्यात डाळ घाला.
सांबार भरपूर उकळल्याशिवाय परफेक्ट चव येत नाही.
उकडलेला बटाटा असल्यामुळे पाणी शोषून घेऊन नंतर सांबार घट्ट होतं.
त्या हिशोबाने पाणी घाला.
बर्‍याच जणांना हाॅटेल टाइप पातळ सांबार आवडतं.
रंग आणि जास्त झणझणीत सांबार हवं असेल तरच लाल तिखट घाला.
एरवी सांबार मसाला आणि सुक्या मिरच्यांचा तिखटपणा व्यवस्थित होतो.

Leave a Reply