चीज पराठा रेसिपी – 1

All Time Favourite Cheese Stuff Paratha Recipe – Cheese Stuff Flatbread Recipe

cheese paratha, stuffed paratha, paratha recipes, cheese recipes

पराठ्याच्या वेगवेगळ्या प्रकारांपैकी अनेकांचा आवडता प्रकार. शाकाहारी लोकांसाठी दूधदुभत्यापासून मिळणार्‍या प्रोटीन आणि कॅल्शियमसाठी चीज हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे चीज घालून केलेला पराठा हा मुलांसाठीसुद्धा पौष्टिक पदार्थ आहे. तेवढचं चवीला मस्त चटपटीत म्हणून मुलं खूश आणि तरीही हेल्दी आहे म्हणून आयाही खूश.

साहित्य –
200 ग्रॅम/ साधारण 2 वाट्या कोणतही चांगल्या प्रतिचं किसलेलं चीज
1/4 वाटी अगदी बारीक चिरलेला कांदा (शक्यतो आॅनिअन चाॅपरमधून काढलेला)
1 – 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
1 टीस्पून चाट मसाला
थोडीशी बारीक चिरलेली कांद्याची फक्त हिरवी पात
चवीपुरतं मीठ (चीजमधलं मीठ विसरू नका)
पारीसाठी –
2 वाट्या कणिक
तेल

कृती –
कणकेत 1 – 2 टेस्पून गार तेल घालून कणिक खूप सैल नाही, पण तरीही साधारण मऊ भिजवा.
नेहमीसारखी थोडावेळ मुरू द्या.
कांदापात आणि हिरवी मिरची धुऊन व्यवस्थित कोरडी करून घ्या.
एका मोठ्या बोलमध्ये चीज, कांदा आणि सारणासाठीचं सगळं साहित्य मिक्स करा.
आता कणकेचे दोन गोळे घेऊन ते पुरीएवढे लाटा.
एका पोळीवर 2 – 3 टेस्पून चीजचे सारण पसरा.
सारण अगदी कडेपर्यंत न पसरता थोडी जागा मोकळी ठेवा.
पराठा गच्च भरला जाईल पण फाटणार नाही इतपत सारण भरा.
या सारण असलेल्या पोळीवर दुसरी पोळी ठेवून बोटाने दाबून कडा नीट बंद करा.
कोरडं पीठ लावून जाडसर पराठा लाटा.
एकीकडे तवा तापत ठेवा.
चांगला तापला की पराठा तव्यावर टाका.
तेल सोडून दोन्ही बाजूंनी खमंग भाजा.
गरम गरम चीज पराठ्याबरोबर टाॅमॅटो केचपच हवं.

असाच तुम्ही पनीर किंवा अर्ध चीज आणि अर्ध पनीर घेऊन पराठा करू शकता.
कांदा आवडत नसेल तर स्किप करू शकता.
भरलेले पराठे करताना कांदा, मिरची खासकरून कांदा शक्यतो आॅनिअन चाॅपरमधून काढा म्हणजे पाणी न सुटता परफेक्ट हवा तसा बारीक होतो.
कांदापातीऐवजी कोथिंबीर किंवा कसुरी मेथीही घालता येईल.
कोणतेही सारण भरलेले भाज्यांचे पराठे करताना भाज्या धुतल्यावर पूर्ण कोरड्या करा.
भाज्यांमध्ये किंचीतही पाणी राहिल्यास सारण ओलसर होऊन पराठे फाटण्याची शक्यता असते.

Leave a Reply