अंडा फ्राईड राईस रेसिपी – टेस्टी वन डिश मील

Egg Fried Rice Recipe – Tasty One Dish Meal

महिला दिन विशेष – नवर्‍याच्या हातचं 😀

egg fried rice, rice recipes, egg recipes, one dish meal
महिला दिन आज असला तरी, रविवार असल्यामुळे आमच्याकडे तो कालच साजरा करण्यात आला. तसंही मेजाॅरिटीप्रमाणे आमच्याकडे रोजच महिला दिन असतो. पण शेवटी तारखेचं महत्त्व आहेच ना!🙂

साहित्य –
11/2 वाटी तांदूळ
7 – 8 अंडी
1 मोठा कांदा
1 – 2 टाॅमॅटो
3 – 4 हिरव्या मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
फोडणीसाठी –
4 – 5 टेस्पून तेल
1 टीस्पून जिरं
1/2 टी स्पून लाल तिखट
हळद

कृती –
सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ मोकळा, फडफडीत शिजवून घ्यायचा आहे.
त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुऊन निथळत ठेवा.
एका मोठ्या पातेल्यात 5 – 6 वाट्या पाणी उकळत ठेवा.
पाण्यात अगदी थोडसं तेल घाला.
पाण्याला चांगली उकळी आली की त्यात तांदूळ घाला.
तांदूळ थोडे शिजले की पाण्यावर येतील.
तांदूळ टचटचीत असतानाच ज्याला आपण एक कणी राहिल इतपत शिजले म्हणतो तेवढे झाले की चाळणीत ओता.
आता पुन्हा ते थंड पाण्याने धुऊन घ्या आणि निथळत ठेवा.
एकीकडे भांड्यात अंडी फोडून थोडेसे मीठ घालून फेटून ठेवा.
कांदा उभा पातळ चिरा.
टाॅमॅटोच्या मोठ्या फोडी करा.
मिरच्याही चिरून घ्या.
कढईत तेल तापवून जिरं आणि मिरच्या घालून फोडणी करा.
थोडस परतून त्यात कांदा घाला.
कांदा व्यवस्थित लाल झाला की हळद आणि तिखट घाला.
त्यावर फेटलेली अंडी घाला.
परतून नेहमीसारखी भुर्जी करा.
त्यात शिजलेला भात घाला.
त्यावर टाॅमँटोच्या फोडी आणि मीठ घालून मिक्स करा.
दोन मिनिटे परतून गॅस बंद करा आणि झाकण ठेवा.
म्हणजे टाॅमॅटो जो वरून घातला आहे तो थोडा मऊ होईल.
हे असे टाॅमॅटो वरून घालण्याचे लाॅजिक खरंतर मलाही समजले नाही.
पण विचारल्यावर मला असं करून बघायच आहे हे उत्तर मिळालं.
आणि शेफ स्वयंपाकात अतिशय एक्सपर्ट असल्यामुळे पुढे कोणी काही बोलण्याचा प्रश्नच नसतो.😀
तयार राईस कांदापात/कोथिंबीर किंवा पुदिना घालून सर्व्ह करायचा की करायला सांगायचा ते बघा आता.

या प्रमाणात केलेला राईस 4 – 5 जणांना अगदी पोटभर होतो.
हा फ्राईड राईस करताना तुम्ही चवीप्रमाणे अनेक बदल करू शकता.
लसूण, इतर आवडीचे मसाले, शिवाय हव्या त्या भाज्याही यात घालता येतील.

One thought on “अंडा फ्राईड राईस रेसिपी – टेस्टी वन डिश मील

Leave a Reply