गुजराती हांडवो

Gujarati Handvo Recipe – Savory Cake made with Mix Lentils and Vegetables

gujarati handvo, savory cake, mix lentils, vegetables, healthy meal

गुजरातमधल्या अनेक प्रसिद्ध पदार्थांपैकी एक म्हणजे हांडवो. ढोकळा, फाफडा, उंधीयोच्या यादीतला एक चविष्ट पदार्थ. मिसाईल नाही बरं का!🙂 इडली, डोश्याप्रमाणेच हांडवो आंबवून केला जातो. पण पारंपारिक पद्धतीने हांडवो करताना पीठ आंबल्यावर हांडवो बेक केला जातो. पूर्वीच्या काळी वाळू तापवून हांडवो बेक केला जायचा. आता अर्थातच आपण ओव्हन वापरू शकतो.

तांदूळ, मिश्र डाळी आणि भरपूर भाज्या असल्यामुळे हांडवो चवीला जितका खमंग लागतो, तितकाच तो पौष्टिक आहे. अगदी डाएटवाल्यांना सुद्धा. फोडणी आपण आपल्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकतो. कार्बोहायड्रेटस्, प्रोटिन्स आणि भाज्यांमुळे भरपूर व्हिटॅमिन्स असलेलं परफेक्ट वन डिश मील होऊ शकतं. तसं बघितलं तर आपले अनेक पारंपारिक भारतीय पदार्थ या व्याख्येत बसणारे आहेत. या गोष्टीचा विसर पडू न देणं आपल्याच हातात आहे.

पारंपारिक रित्या हांडवो बेक करण्याची पद्धत असली तरी पसरट कढई किंवा पॅनमध्येही हांडवो सोप्या रितीने करता येतो. मी हा हांडवो नाॅनस्टिक पॅनमध्ये केला आहे.

साहित्य –
1 वाटी/कप तांदूळ
(मी 200 ml च्या मेजरिंग कपने सगळे साहित्य घेतले आहे.)
1/4 वाटी/कप चण्याची डाळ
1/4 वाटी/कप उडिद डाळ
1/4 वाटी/कप तूर डाळ
1/4 कप पिवळी मूगाची डाळ
1 टीस्पून मेथी दाणे
1 कप दुधी भोपळ्याचा किस
1 कप गाजराचा किस
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
1 – 2 हिरव्या मिरच्या
1 – 2 टीस्पून किसलेलं आलं
1/2 ते 1 टी स्पून लाल तिखट
हळद
1 टीस्पून इनो
चवीप्रमाणे मीठ

फोडणीसाठी –
4 – 5 टे स्पून तेल
1 टेस्पून तीळ
1 टीस्पून मोहरी
1 टीस्पून जिरं
कढीपत्ता

कृती –
तांदूळ आणि सगळ्या डाळी स्वच्छ धुऊन 5 – 6 भिजवा.
भिजवताना त्यात मेथ्याही घाला.
तांदूळ आणि डाळी एकत्र भिजवले तरी चालतील.
त्यानंतर तांदूळ आणि डाळी उपसून किंचीत रवाळ वाटून घ्या.
वाटताना अगदी आवश्यक तेवढेच पाणी घाला.
इडलीसाठी वाटतो तसेच आणि त्याच कन्सिस्टन्सीचे बॅटर ठेवा.
2 ते 4 तास हे पीठ आंबण्यासाठी ठेवा.
पीठ खूप फुगलं नाही तरी चालेल कारण आपण त्यात इनो घालणारच आहोत.
हांडवो करायला घेण्याआधी फोडणी करून घ्या.
तेल तापवून फोडणीसाठी दिलेले सगळे जिन्नस घालून खमंग फोडणी करा.
पीठात भाज्या आणि सगळे मसाले, मीठ घालून मिक्स करा.
याच मिश्रणात थोडीशी फोडणी घालून मिक्स करा.

आता मिश्रणाचे दोन भाग करा.
नाॅनस्टिक पॅन किंवा पसरट कढई मध्यम आचेवर तापत ठेवा.
थोडीशी तापली की राहिलेल्या फोडणीपैकी अर्धी फोडणी पॅन किंवा कढईमध्ये घालून पसरून घ्या.
मिश्रणाचे आपण जे दोन भाग केले आहेत, त्यापैकी एका भागात अर्धा टीस्पून इनो घालून ढवळून घ्या.
हे बॅटर पॅनमध्ये फोडणीवर ओतून सारखे करून घ्या.
गॅस लो मिडिअमच ठेवा.
आता झाकण ठेवून दहा – बारा मिनिटे हांडवो शिजवून घ्या.
दहा – बारा मिनिटांनी हांडवो वरच्या बाजूने शिजलेला दिसेल.
पीठ ओले, कच्चे न दिसता शिजलेले दिसेल.
हलक्या हाताने कालथा फिरवून कडा सुटल्या आहेत का ते बघा.
हांडवो सगळीकडून कडेने सुटला की हळूवारपणे नीट उलटा.
हांडवो केकसारखा गरगरीत फुगलेला दिसेल.
अगदी सावकाश उलटा.
पॅनवर एखादे ताट ठेवून पॅन उलटा करूनही हांडवो उलटवू शकता.
आता परत अंदाजे दहा मिनिटे झाकून खालची बाजूही खमंग करा.
याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचा हांडवो करा.
गरम गरम हांडवो चटणी किंवा साॅस कशाबरोबरही छान लागतो.

वर दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात दोन मोठे हांडवो होतात.
दोन मोठे हांडवो चार माणसांना पोटभर होतात.

Leave a Reply