एप्रिल दि 13th

April The 13th –  A day in my life – Thoughts and Experiences

april the 13th, april, memories, thoughts, khadadi, zesty flavours

सकाळी चहा घेता घेताच व्हाॅटस् appवर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन घेऊन झाल्या. त्यादिवशी मंगळवार असल्यामुळे नेहमीसारखा वर्किंग डे होता. दुपारी मला शाळा होती, त्यामुळे गुढीपाडवा संध्याकाळी साजरा करायचा प्लॅन होता. म्हणून चहा पिऊन झाल्यावर सगळ्यात आधी दही चाळणीत ओतलं. म्हणजे दुपारपर्यंत चक्का तयार. आम्रखंड, पुर्‍या, बटाट्याची भाजी डिनरसाठी करणार होते.
चक्का लावल्यावर आता सकाळचं रूटिन आटपायला घेऊ या असा विचारच करत होते.

इतक्यात आमच्या सुपरवायजरचा मेसेज आला. माझी सहकारी मैत्रिण, मी आणि ती जोडीनेच रेणुकाच्या शाळेतल्या एका वर्गावर लंच ड्युटीला असतो. ती पाॅझिटिव्ह आली होती आणि त्यामुळे नियमाप्रमाणे मलाही टेस्ट करावी लागेल. तसं तर सोमवारीच मला त्याने सांगितलं होतं की ती टेस्टसाठी गेली आहे. पाॅझिटिव्ह आली तर तुलाही टेस्ट करावी लागेल. पण तोपर्यंत हे सगळं जर तरच प्रकरण असल्यामुळे घरी येऊन मी विसरूनही गेले. आली तर बघू, पुढचं पुढे याशिवाय काहीही मनात आलं नाही. शुक्रवारी आम्ही भेटलो तोपर्यंत ती मैत्रिण ठणठणीत होती. एकदाही खोकल्याच किंवा शिंकल्याच मला आठवत नव्हतं आणि मंगळवारी सकाळी अचानक असा मेसेज. टेस्ट करून रिझल्ट येईपर्यंत घरी राहायच होतं. बोंबला! प्रकरण इथपर्यंत येईल असं वाटलच नव्हतं. नवर्‍याचा काॅल चालला होता, लगेच जाऊन त्याला सांगितलं.  तो म्हणाला फक्त एवढा काॅल संपवून खाली येतो.  मग ताबडतोब अपाॅइंटमेंट कशी घ्यायची त्याची माहिती काढली. सुदैवाने online अपाॅइंटमेंटच्या साइटवर लगेच त्यादिवशीची दुपारचीच अपाॅइंटमेंट मिळाली. तोपर्यंत काय करायच असतं तेच कळेना. मुलींना म्हटलं थोड्या लांबच रहा. त्यावर मनाली म्हणालीही मम्मा काही होत नाहीये. तू आलीच पाॅझिटिव्ह तर आम्हीही येणारच. मनात प्रश्न आलेच आत्ता स्वयंपाक करू की नको, या क्षणापासून quarantine होऊ की स्वयंपाकघरात थोडी तयारी करून ठेऊ. नवरा स्वयंपाकात एक्सपर्ट असल्यामुळे आणि मुलीही भरपूर मोठ्या आहेत म्हणून, उपाशी न राहण्याइतका स्वयंपाक मनालीही करते त्यामुळे त्या आघाडीवर कसलीच काळजी नसते. बरं मला स्वत:ला आतून एक टक्काही काही जाणवत नव्हतं. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे वगैरे वगैरे यापैकी एकही लक्षण नव्हतं. वास, चव सगळ्या संवेदना व्यवस्थित होत्या. पण…तो पण असतोना. आत्तापर्यंत ऐकलेलं, वाचलेलं सगळं आठवायला, दिसायला लागलं. ते asymptomatic वगेरे वगैरे भानगडी डोक्यात यायला लागल्या. आम्ही कोणीच अजिबातच घाबरलो किंवा काळजीत नव्हतो. पण नक्की काय करू ते मला कळेना. शेवटी मनिष म्हणाला, “जर तू आजारी नाहीयेस, तुला काही होत नाहीये तर सगळं नेहमीसारखं चालू ठेव. रिपोर्ट येईपर्यंत काहीही मनात आणू नकोस.” मग ठरवलं ओके! त्याप्रमाणे दुपारचा स्वयंपाक केला, जेवलो. 
 
दुपारी पावणे तीनची अपाॅइंटमेंट होती.
आमच्या घराजवळच एक ड्रायव्हिंग स्कूल आहे. त्याच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत टेस्टिंग सेंटर आहे. सेंटरच्या बाहेर काही कर्मचारी उभे होते. त्यांना वेळ सांगितल्यावर ते जागा झाली की आत सोडत होते. आपला नंबर येईपर्यंत कार ड्राइव्ह वेमध्ये उभी करून कारमध्येच बसून राहायला सांगितले. नंबर आल्यावर ते स्वत: बोलवायला येत होते. पाच मिनिटांतच आमचा नंबर आला. माझ्याबरोबर मनिषलाही आत सोडले. एका बूथमध्ये एका दाराने आत गेल्यावर नर्सने स्वॅब घेतला आणि पुढच्या मिनिटाला दुसर्‍या दारातून बाहेर. ज्याची टेस्ट आहे त्याने खुर्चीवर बसायचे आणि बरोबर कोणी असेल तर त्याने एक्झिटच्या दारात. मोजून दहा – पंधरा मिनिटांत बाहेर पडलो. येताना 
 
रस्त्यात असतानाच आईबाबांचा गुढीपाडव्याचा फोन आला. त्यांना घरी गेल्यावर फोन करते असं सांगितलं. त्याप्रमाणे घरी गेल्यावर फोन केला. बाहेर ग्रोसरी करायला गेलो होतो असं सांगितलं. मुलींनाही सांगून ठेवलच होतं, भारतातून फोन आले तर रिपोर्ट येईपर्यंत काहीही सांगायच नाही. नेहमीसारखं नाॅर्मल बोला. घरी आल्यावर मस्तपैकी चहा घेतला. आईबाबांना, सासरी फोन केले. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. जेवायला काय केलं होतं, मी काय करणारे हे सगळं नेहमीचं बोलून झालं. रात्री मी आम्रखंड, पुर्‍या, बटाट्याची भाजी, वरणभात असा सगळा साग्रसंगित स्वयंपाक केला. फ्रेश आंबे तर नाहीत पण इंडिअन स्टोअरमध्ये मँगो पल्पचा टिन मिळतो तो मी आणून ठेवला होता. आयुष्यात पहिल्यांदा घरी केलेलं आम्रखंड खाल्लं. आम्रखंड करायला इतकं सोप्प आहे आणि इतकं छान लागतं यावर विश्र्वास बसत नव्हता.
चितळ्यांपेक्षा भारी झालय यावर एकमत झालं. येस्स! “खादाडी’वर रेसिपी शेअर करते नक्की.🙂  रात्री जेऊन झोपलो. गोडाधोडाच्या जेवणामुळे मस्त झोप आली.

रिपोर्ट मोस्टली दुसर्‍या दिवशी सकाळी किंवा जास्तीत जास्त ४८ तासांत मिळेल असं सांगितलं होतं. जर पाॅझिटिव्ह आला तर नियमाप्रमाणे फोन करतात. पुढची सगळी प्रोसिजर सांगायला आणि निगेटिव्ह असेल तर फक्त ईमेल येतं. त्याप्रमाणे सकाळी उठल्यावर फक्त फोनकडे लक्ष होतं. साडे आठच्यासुमारास मेल बाॅक्समध्ये मेल आलेलं दिसलं. फक्त रिपोर्ट आले आहेत एवढच मेल आलं होतं. प्रत्यक्ष रिपोर्ट दुसर्‍या ठिकाणी ओपन करून बघायचे होते. फोन न येता फक्त मेल आल्यामुळे सुटलो असं वाटतच होत. पण प्रत्यक्ष रिपोर्ट उघडून वाचेपर्यंत खात्री नव्हती. ईमेलमध्ये मेल आल्यानंतर पंधरा मिनिटांनी रिपोर्ट बघा असं होतं. पंधरा मिनिटांनी मी एक नंबर चुकीचा टाकत होते त्यामुळे पेज ओपन होत नव्हत. मग परत वर जाऊन मनिषला सांगितलं. त्याचा काॅल चालू होता म्हणून मी खाली आले. तो मिटिंग संपवून खाली यायच्या आधीच माझी चूक माझ्या लक्षात आली, मग परत बघितलं आणि फायनली NEGATIVE. मुली आपापल्या खोल्यांमध्येच होत्या. मनिषने त्यांना खाली येता येताच मम्मा नापास झाल्याची गुड न्यूज दिली.
काळजी करू नका काळजी घ्या.
मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सतत साबण लाऊन स्वच्छ हात धुवा आणि सुरक्षित अंतर ठेवा.

5 thoughts on “एप्रिल दि 13th

Leave a Reply