चविष्ट भेंडी पनीर भाजी रेसिपी

Bhindi Paneer Sabji Recipe – Lady finger / Okra Cottage Cheese Curry

bhindi, paneer recipes, punjabi dishes, okra, lady fingers

भेंडीची परतून केलेली कुरकुरीत भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. तीच गोष्ट पनीरची. पनीरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण नेहमीच करतो. एक अतिशय व्हर्सेटाइल पदार्थ. तिखट गोड काहीही करा. छानच लागतो.

मग या दोन्ही पदार्थांचं काॅम्बिनेशन किती छान लागेल. शिवाय हिरवी भाजी आणि पनीर (प्रोटीन आणि कॅल्शियम) एकत्र केल्यामुळे ही भाजी पौष्टिक ही आहे. प्रोटीन हा आपल्या आहारातील एक अतिशय महत्वाचा घटक आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. पण आहारतज्ञांच्या मते प्रोटीन मग ते शाकाहारी किंवा मांसाहारी कोणत्याही प्रकारचे असो, प्रोटिनचा आपल्या शरीराला पूर्ण फायदा होण्यासाठी नेहमी प्रोटिनबरोबर ‘अ’ जीवनसत्व घेतले पाहिजे. प्रोटीन + ‘अ’ जीवनसत्व ही जोडी कायम लक्षात ठेवा. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे प्रोटिनबरोबर विशेषत: रंगीत भाज्या शिजवून किंवा कच्चे सॅलड किंवा फळं खा.

साहित्य –
1/2 कि भेंडी
1/4 कि पनीर
1 मोठा कांदा
1 टाॅमॅटो
2 – 3 हिरव्या मिरच्या
1 – 2 टीस्पून धणेपूड
3 – 4 टेस्पून तेल
मोहरी
जिरे
हिंग
हळद
1/2 टीस्पून लाल तिखट
1/2 टीस्पून गरम मसाला
चवीप्रमाणे मीठ

कृती –
भेंड्या स्वच्छ धुऊन पूर्ण कोरड्या करा.
वाळल्यावर भेंडीच्या गोल चकत्या चिरा.
पनीरचे लहान चौकोनी तुकडे करा.
कांदा आवडीप्रमाणे उभा, पातळ चिरा किंवा बारीक चिरला तरी चालेल.
टाॅमॅटो आणि हिरव्या मिरच्याही बारीक चिरा.
कढईत तेल गरम करा.
तेल चांगले तापले की मोहरी, जिरं आणि हिंग घालून खमंग फोडणी करा.
फोडणीत हिरव्या मिरच्या घाला.
मिरच्या तळल्या गेल्या की कांदा घालून लाल होईपर्यंत परता.
नंतर टाॅमॅटो घाला.
टाॅमॅटो थोडा मऊ झाला की त्यात हळद, तिखट आणि धणेपूड घालून तेल सुटेपर्यंत परता.
नंतर त्यात भेंडी घालून हलक्या हाताने ढवळा.
आता नेहमीसारखी झाकण न ठेवता भाजी शिजवा.
शिजताना जास्त परतू नका म्हणजे चिकट होणार नाही.
भाजी शिजली की त्यात पनीर घालून मिक्स करा.
आता झाकण ठेऊन 2 – 4 मिनिटे शिजू द्या.
झाकण काढून मीठ घाला आणि पुन्हा थोडीशी परता.
गॅस बंद करून वरून कोथिंबीर घाला.

पनीर घालताना कुस्करून घातले तरी चालेल.
फोडणी करतानाच थोडं जास्त तेल घेतलं तर पनीर वेगळं शॅलो फ्राय करण्याची गरज नाही.
भेंडीची भाजी शिजवताना टाॅमॅटो, लिंबू, आमसुलं असा कोणताही आंबट पदार्थ घातला तर भाजी चिकट होत नाही.
मी घातलं नाहीये. पण हवे असल्यास भाजीत आलं, लसूण बारीक चिरून किंवा वाटून घालू शकता.

Leave a Reply