शाही ब्रेड (प्लेन) – झटपट गोड पदार्थ

Quick Shahi Bread Recipe – Deep Fried Bread Soaked in Sugar Syrup

shahi bread, quick version, bread mithai, desserts

पारंपारिक पद्धतीने शाही ब्रेड किंवा शाही तुकडा करताना तळलेल्या ब्रेडवर घट्ट बासुंदी किंवा रबडी घालतात. पण मी हा शाही ब्रेड थोडा वेगळ्या प्रकारे करते. याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे एकतर ह्या पद्धतीने केलेला शाही ब्रेड अगदी पटकन होतो आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे बासुंदी खूप आवडते, पण ती पुरीबरोबर. ब्रेडवर घालून नाही. हा शाही ब्रेड अगदी कुरकुरीत आणि बेताचा गोड होतो.

एखादी मेजवानी, पार्टी, पाॅटलक अशा प्रसंगी नेहमीचे श्रीखंड, बासुंदी, खीर, गुलाबजाम इ. पर्याय नको असतील तर हे वेगळे आॅप्शन ट्राय करता येईल. विविध चवींचा आणि स्वादाचा शाही ब्रेड करण्यासाठी मी रेसिपीच्याशेवटी जे पर्याय दिले आहेत ते नक्की बघा.

साहित्य –
4 – 5 ब्रेड स्लाइसेस (शक्यतो व्हाइट ब्रेड)
1 वाटी साखर
1 वाटी पाणी
तळण्यासाठी तेल किंवा तूप
1 – 2 टेस्पून रूह अब्जा (रंग आणि फ्लेवरसाठी)
1 टीस्पून गुलाबपाणी
गार्निशिंगसाठी पिस्ता आणि बदामाचे काप

कृती –
ब्रेडचे तुम्हाला हवे त्या आकाराचे तुकडे करा.
थोडावेळ ब्रेडचे तुकडे न झाकता तसेच उघडे ठेवा.
ब्रेड वाळलेला असेल तर कमी तेल पितो.
साखरेत पाणी घालून साधारण एकतारी पाक तयार करा.
पाक एकतारीपेक्षा थोडासा कमी झाला तरी चालेल.
गुलाबजामसाठी करतो तितका पातळही करायचा नाहीये.
पाक झाला की गॅस बंद करा.
पाकात रूह अब्जा आणि गुलाबपाणी घालून मिक्स करा.
आता तेल चांगले गरम करून ब्रेड कुरकुरीत तळून घ्या.
तळलेले तुकडे पेपर टाॅवेलवर पसरून निथळून घ्या.
नंतर हे तुकडे पाकात घाला.
पुढची बॅच तळून आणि निथळून होईपर्यंत आधी घातलेले तुकडे पाकात मुरू द्या.
एवढ्या वेळेत पाक ब्रेडच्या तुकड्यांमध्ये व्यवस्थित आतपर्यंत शिरतो.
तयार शाही ब्रेड सर्व्हिंग बोलमध्ये काढा.
वरून बदाम पिस्त्याचे तुकडे घाला.

शाही ब्रेडसाठी तुम्ही हवा असल्यास ब्राऊन ब्रेड घेतला तरी चालेल.
पण व्हाईट ब्रेडमुळे एक छान क्रिमी आणि मिल्की अशी चव येते.
शिवाय पाकात रंग घालायचा असेल तर तोही उठून दिसतो.
माझ्याकडे असलेला ब्रेड अगदी ताजा होता आणि त्याच्या कडाही अगदी पातळ असल्यामुळे मी काढल्या नाहीयेत.
तुम्हाला नको असतील तर तुम्ही कडा काढू शकता.
ब्रेडचे तुकडेही आवडीप्रमाणे वेगवेगळ्या आकारात करता येतील.
त्रिकोणी, चौकोनी किंवा कुकी कटर वापरून वेगवेगळे आकार देता येतील.
तसेच तळतानाही डिप फ्राय किंवा दोन्ही बाजूंनी दोन्ही बाजूंनी तूप लावून तव्यावर किंवा टोस्टरमध्येही करू शकता.
ओव्हनमध्ये बेक केला तरी चालेल.
ब्रेड कोणत्याही प्रकारे तळला तरी व्यवस्थित कुरकुरीत करा.
नाहीतर पाकात घातल्यावर मऊ (soggy) पडेल.
शाही ब्रेड करताना आवडीप्रमाणे तुम्ही अनेक वेगवेगळ्या चवीचा करू शकता.
यासाठी काही आॅप्शन्स मी शेअर करते आहे.
रोझ फ्लेवरसाठी मी वर लिहिल्याप्रमाणे पाकात रूह अब्जा आणि गुलाबपाणी घाला.
पाकात फक्त वेलची, जायफळ आणि केशर घालून.
जिलबीची चव हवी असेल तर पाकात लिंबू पिळा आणि वेलची पूड आणि जिलबीचा रंग घाला.
व्हॅनिला इसेन्स किंवा इतर कोणताही इसेन्स
केशर, वेलची सिरप
स्ट्राॅबेरी किंवा इतर फळांचा क्रश किंवा सिरप
गुलाबपाणी किंवा केवडापाणी
याशिवाय तुम्हाला काही प्रकार सुचले किंवा तुम्ही करून बघितले तर मलाही नक्की सांगा.

2 thoughts on “शाही ब्रेड (प्लेन) – झटपट गोड पदार्थ

  1. खरंच खूप सुंदर घरकामातुन वेळ काढून तु काहीतरी वेगळंच करतेस कौतुक करावं तेवढं थोडंच आहे तुझं .आम्हाला अभिमान आहे कि…….तु आमची मैत्रीण आहेस. WELL DONE & KEEP IT UP

Leave a Reply