पालक वड्या रेसिपी

Spinach Bites Cooked with Gram Flour

spinach bites, spinach recipes, breakfast, palak recipes

कोथिंबीरीचा सिझन नसेल किंवा तुम्हाला कोथिंबीर सहज मिळण्यासारखी नसेल तर बदल म्हणून पालकाच्या या वड्या नक्की करून बघा. विशेषत: परदेशात राहणार्‍या मंडळींसाठी. कारण परदेशात कोथिंबीर हवी तेव्हा मिळाली नाही तरी स्वच्छ निवडलेला, हिरवागार, पालक भरपूर प्रमाणात अगदी खाऊन कंटाळा येईल इतका उपलब्ध असतो.

साहित्य –
200 ग्रॅम किंवा अंदाजे 1 मोठी जुडी पालक/2 ते अडीच वाट्या चिरलेला पालक
1 वाटी बेसन पीठ
1/4 वाटी तांदळाचे पीठ किंवा बारीक रवा
1 वाटी पाणी
1 मध्यम आकाराचा कांदा (ऐच्छिक)
6 – 7 लसूण पाकळ्या
1 आल्याचा तुकडा
3 – 4 हिरव्या मिरच्या किंवा 1 – 2 टीस्पून लाल तिखट
1 टीस्पून जिरे
1 टीस्पून हळद
1 – 2 टेस्पून तेल
मीठ

वरून घेण्यासाठी फोडणी –
तेल
मोहरी
हिंग

कृती –
पालक स्वच्छ धुऊन, निथळून, बारीक चिरून घ्या.
कांदा घालणार असल्यास तोही अगदी बारीक चिरून घ्या.
आलं, मिरच्या, लसूण वाटून ठेचा करा.
बेसन पीठात तांदूळ/रवा आणि चवीप्रमाणे मीठ घाला.
पाणी घालून भज्यांसाठी भिजवतो तसं पीठ भिजवा.
कढईत तेल गरम करा.
तेल तापल्यावर जिरं, आलं लसूण पेस्ट, हळद घालून फोडणी करा.
आता त्यात कांदा घालून दोन मिनिटे परता.
आलं – लसूण, कांदा खूप खमंग परतायची आवश्यकता नाही.
कांद्यावर बारीक चिरलेला पालक घालून मिक्स करा.
पालक एकजीव झाला की त्यात भिजवलेलं पीठ घाला.
गुठळ्या होऊ न देता नीट मिक्स करा.
ढवळून झाकण ठेवा.
ही गोळा भाजी 10 – 15 मिनिटे अगदी बारीक गॅसवर शिजवा.
दहा मिनिटांनंतर पालकाच्या मिश्रणाची छोटी गोळी करून बघा.
हाताला न चिकटता खुटखुटीत गोळी झाली पाहिजे.
मिश्रण चिकट वाटले तर आणखी थोडावेळ शिजवा.
व्यवस्थित शिजले की गॅस बंद करा.
मिश्रण थोडं गार होऊ द्या.
ताटाला किंवा ट्रेला तेलाचा हात लावून वड्या थापून घ्या.
वड्या गार होईपर्यंत एकीकडे फोडणी करा.
फोडणीसाठी जरा जास्त तेल घेऊन, मोहरी हिंग घालून खमंग फोडणी करा.
वड्या पूर्ण गार झाल्या की काढून घ्या.
वरून ढोकळ्यावर घालतो तशी भरपूर फोडणी घाला.
पालकाच्या या वड्या चटणी, साॅसबरोबर छान लागतातच.
शिवाय खिचडी, दहीभात, वरणभात किंवा भाताच्या कोणत्याही प्रकाराबरोबर तोंडी लावणे म्हणून घेतल्या तर मस्त बेत होतो.

याच पद्धतीने कोथिंबीरीच्याही वड्या करता येतील.
मला वड्या डिप फ्राय किंवा शॅलो फ्रायही करायच्या नव्हत्या म्हणून मी वरून फोडणी घातली.
तुम्ही आवडीप्रमाणे तळू किंवा शॅलो फ्राय करू शकता.
अजिबात तेल न घालता नुसत्या उकडलेल्या वड्याही चांगल्या लागतात.
कांदा आणि लसूण आवडत नसेल तर घातला नाही तरी चालेल.
तिखटही चवीप्रमाणे कमीजास्त करता येईल.

Leave a Reply