कलरफूल पनीर जालफ्रेझी रेसिपी

Paneer Jalfrezi Recipe in Marathi – Cottage Cheese and Mix Bellpeppers Saute in Variety of Spices

Panner jalfrezi, panner recipes, capscicum recipes,bellpeppers

यातला जाल हा शब्द बंगाली ‘झाल’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. ज्याचा मूळ अर्थ जहाल असा आहे. म्हणजेच झणझणीत किंवा स्पायसी. नावाप्रमाणेच ही भाजी चवीला मसालेदार असते. शिवाय करायलाही अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे. रंगीत सिमला मिरची आणि पनीर असल्यामुळे लहान मुलांनाही ही भाजी खूप आवडते.

या ब्लाॅगवरील भाज्यांचे इतर अनेक प्रकार नक्की करून बघा.

साहित्य –
2 वाट्या पनीरचे तुकडे
2 वाट्या सिमला मिरचीचे तुकडे (मिक्स रंगाच्या)
1 – 2 मध्यम आकाराचे कांदे
1 मोठा टाॅमॅटो
2 – 3 हिरव्या मिरच्या
4 – 5 लसूण पाकळ्या
1 इंच आले
3 – 4 टेस्पून तेल
1 टीस्पून जिरे
1 टीस्पून धणेपूड
1 टीस्पून लाल तिखट
1/2 टीस्पून हळद
1/2 ते 1 टीस्पून गरम मसाला
चवीप्रमाणे मीठ

कृती –
भाजी करायला घेण्याआधी, पनीर विकतचे किंवा फ्रिजरमध्ये ठेवले असल्यास 15 – 20 मिनिटे गरम पाण्यात ठेवा.
सिमला मिरचीच्या बीया काढून उभे, लांबट तुकडे करा.
कांदाही उभा पातळ चिरा.
टाॅमॅटो मिक्सरमधून वाटून प्युरी करा.
आलं, लसूण, मिरच्या खूप बारीक चिरा किंवा पेस्ट करा.
पॅनमध्ये तेल गरम करून जिरं घाला.
जिरं तडतडलं की आलं लसूण पेस्ट घाला.
चांगली परतून मग त्यात कांदा घाला.
कांदाही खमंग परतून ब्राऊन करा.
आता त्यात टाॅमॅटो प्युरी घालून थोडसं परता.
आता त्यात हळद, तिखट आणि धणेपूड घालून तेल सुटेपर्यंत परता.
मसाल्याला तेल सुटलं की त्यात अगदी थोडं (2 – 3 टेस्पून) थंड पाणी घाला.
आता त्यात सिमला मिरची घालून झाकण न ठेवता शिजवा.
अधून मधून परतत सिमला मिरची थोडी करकरीतच राहिल इतपतच शिजवा.
सिमला मिरची शिजली की त्यात पनीर आणि मीठ घाला.
अगदी हलक्या हाताने पनीरचे तुकडे न मोडता भाजी मिक्स करा.
2 – 4 मिनिटे मंद गॅसवर झाकण न ठेवता शिजवा, वरून गरम मसाला घालून परत मिक्स करून गॅस बंद करा.

या भाजीला सहसा ग्रेव्ही नसते.
त्यामुळे आवडीप्रमाणे भाजी पूर्ण कोरडी करा किंवा अगदी थोडी अंगाबरोबर ग्रेव्ही करा.
भाजी शिजताना झाकण ठेवल्यास भाजीला पाणी सुटेल.
रंगीत सिमला मिरच्या मिळाल्या नाहीत तर फक्त हिरवी सिमला मिरची घालूनही भाजी करू शकता.
तेल आणि तिखट चवीप्रमाणे कमीजास्त करता येईल.

Leave a Reply