हा छंद जीवाला लावी पिसे!

Shivali’s Kitchen – Minnesota Memories

Shivali's Kitchen, Minnesota Memories,food photography
Shivali's Kitchen, Minnesota Memories, food photography

Shivali’s Kitchen ह्या नावाने मी हा अल्बम तयार केला होता. मिनेसोटाला असताना मी फेसबुकवर आले होते. त्याआधी आर्कुटवर वगैरे मी कधीच नव्हते. अमेरिकेला जायच्या आधी तशी इंटरनेटच्या दुनियेशी ओळख झाली होती. लॅपटाॅपवर वेब ब्राउझिंग करण्यात वेळ घालविणे सुरू झाले होते. त्याहीआधी पुस्तके आणि मुख्य म्हणजे मासिकं विकत घेऊन वाचायला खूप म्हणजे खूपच आवडायचे. बुकस्टाॅलवर जाऊन हवे ते मासिक विकत आणायचे. शिवाय लायब्ररी तर असायचीच. एखाद्या मासिकाचा एखादा विशेषांक प्रसिद्ध होणार असेल तर अगदी वाट बघत बसायचं. पेपरवाल्याला रोजच्या पेपरबरोबर कधी गृहशोभिका, लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ ह्यातलं काहीतरी आलटून पालटून टाकायला सांगितल जायचं.

Shivali's Kitchen, Minnesota Memories, food photography
Shivali's Kitchen, Minnesota Memories, food photography

गेल्यावर्षीपर्यंत माझ्याकडे ह्या मासिकांचे गठ्ठेच्या गठ्ठे ठेवले होते. पण आता तेच सगळं म्हणण्यापेक्षा, त्याच्याही पार पलिकडचं इंटरनेटवर सर्रास उपलब्ध आहे, ह्या जाणीवेने शेवटी एकदाची ती मासिकं रद्दीत देऊन टाकली.

Shivali's Kitchen, Minnesota Memories, Food Photography

2011मध्ये अमेरिकेला गेल्यावर तर इंटरनेटवाचून पान हालेनासे झाले. मिनेसोटाच्या हाडं गोठवणार्‍या थंडीत -45 डिग्री सेल्सिअस तापमानात 8 महिने सक्तीचं quarantine असतं. त्यावेळेस फक्त आणि फक्त इंटरनेट आणि मैत्रिणींचा ग्रुप ह्याचाच आधार असायचा. स्मार्टफोन नावाची वस्तू तोपर्यंत हातात आली नव्हती. तो नंतर 2013च्या शेवटी घेतला. त्या वाढदिवसाला नवर्‍याकडून गिफ्ट मिळालेला माझा पहिलावाहिला लाडका स्मार्टफोन S4. जो मी पुरेपूर वसूल केला. स्मार्टफोन आल्यावर WhatsApp आलं.

Shivali's Kitchen, Minnesota Memories, Food Photography

त्याआधी मी चक्क लॅपटाॅप उघडून बसायचे. फेसबुकवर तेव्हा मी नविन नविन होते. त्याकाळात डिजीटल कॅमेर्‍याशी मनसोक्त खेळून घेतलं. आधी आमचा जो जुना कॅमेरा होता, तो मनिष जास्त वापरायचा. नेटवर इतरांची फोटोग्राफी बघून, इतर ब्लाॅग वाचून बरेच उद्योग सुरू झाले. ह्याबाबतीत सौ. रोहिणीताई गोरे माझ्या गुरूस्थानी होत्या. रोहिणीताई खूप छान फोटो काढतात आणि लिहितातही. ‘स्मृति‘ नावाचा त्यांचा ब्लाॅग अप्रतिम आहे. त्याशिवाय त्यांचा उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म हा रेसिपी ब्लाॅगही खूप छान आहे. रोहिणीताईंच बघून मी पण फोटो काढायला लागले. ‘मायबोली’आणि ‘मिसळपाव’वर तर मी अक्षरश: पडिक असायचे. मायबोली ही वेबसाइट म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. जगात एक विषय असा नसेल ज्याची मायबोलीवर चर्चा नाही. कथा, कादंबर्‍या, माहिती, चर्चा, अनुभव, आहारशास्त्र आणि पाककला, ललितकला ह्या सगळ्याचा मायबोलीवर खजिना आहे. तेव्हा लागलेली सवय अजुनही कायम आहे. आता पूर्वीइतकं वेड राहिलं नसलं तरी दिवसातून कमीत कमी एकदातरी मायबोलीवर फेरफटका मारल्याशिवाय माझा दिवस जात नाही.

Shivali's Kitchen, Minnesota Memories, Food Photography
Shivali's Kitchen, Minnesota Memories, Food Photography

सिनेमे आणि सिरिअल्स् बघण्यासाठी YouTube आणि आपली मराठी होतं आणि TVवर Netflix. TV सहसा मुलींच्या ताब्यात असायचा. मनिषच्या एका मित्राकडून ‘आपली मराठी’बद्दल समजलं. 2012 – 13 साली “उंच माझा झोका’ ही मालिका खूप गाजली होती. ही मालिका सुरू झाल्याच मला थोडं उशिरा कळालं. तेव्हा काही दिवस तासनतास बसून मी बॅकलाॅग पूर्ण केला होता. YouTubeवर मी ही सिरिअल बघायचे. रोजची रूटिन कामं पटापट आवरायची आणि लॅपटाॅप घेऊन बसायचं. आजही हेच सगळं चालतं, इंटरनेट हा आपल्या आयुष्याचा अविर्भाज्य भाग बनला आहे. पण नव्याची नवलाई फार दिवस टिकत नाही. कोणत्याही गोष्टीची जेव्हा सुरूवात होते आणि ती नविन असते तेव्हाच त्याचं अप्रूप जास्त असते. प्रोफाईल पिक्चरच्या निमित्ताने मी स्वत:चं कितीतरी दिवसांनी हे फोटो बघितले.

6 thoughts on “हा छंद जीवाला लावी पिसे!

Leave a Reply