ट्युलिप्स, टोम्पाश आणि उनाड दिवस – 2

Tulips, Tompouce and Netherlands – 2

Tulips, a Tray of Jewels

Tulips, Netherlands, Lisse, Tulip Fields, Tulip Season
 
 
लिसेला जायच्या आधीच लिसे धरून आणखी तीन रूटस् काढून ठेवले होते. त्यापैकी लिसे हा सगळ्यात पाॅप्युलर रूट आहे. Amsterdamहून सगळ्यात जवळ असल्याने तिकडे जास्त गर्दी असते. दुसरे ठिकाण होते Goeree – Overflakkee. मी फक्त स्पेलिंगच लिहू शकते. उच्चार तुम्ही आपापल्या सोईप्रमाणे हवा तो करा.🙂 नेदरलँडसच्या साउथवेस्ट किनारपट्टीला झीलँड(zeeland) नावाचं प्रसिद्ध बेट आहे. त्याच्या साधारण वरच्या भागात ही गावं आहेत. या गावांच्या आसपास अनेक ट्युलिप्सची शेतं आहेत, शिवाय तो भाग फारसा वर्दळीचा नाही. अशी माहिती गुगलबाबा देत होते.
 

आम्हाला सुट्ट्या असल्या तरी मनिषला सुट्टी नव्हती. पण मंगळवारी 27 एप्रिलला सुदैवाने ‘किंग्ज डे”ची सुट्टी होती. नेदरलँडसचा सध्याचा राजा ‘विल्यम्स अलेक्झांडर’चा 27 एप्रिलला वाढदिवस असतो. अर्थातच नेदरलँडसचा राष्ट्रिय सण. मग राजाचा हा वाढदिवस साजरा करणे आलेच. मनालीने तर आधीच येणार नसल्याचे सांगितले होते. रेणुकाचे हो नाही हो नाही चालले होते. सकाळी उठल्यावर मग ताई येत नाहीये तर मी पण नाही हे फायनल डिक्लेअर झाले. पण अर्थातच आम्ही दोघं कशालाच बधणार नव्हतो कारण आमची हौस फिटली नव्हती. पावसाची पण त्या दिवशी मस्त मेहरबानी होती. नेदरलँडला घराबाहेर पडायचं म्हणजे आधी पावसाचा मूड बघावा लागतो. या चिमुकल्या देशात जास्तीत जास्त दोन अडिच तासांत आपण कुठुनही कुठेही आरामात पोहचू शकतो. सकाळी ब्रेकफास्ट करूनही घराबाहेर पडलो तर दिवसभर हिंडून पाच सहा वाजता चहा प्यायला परत घरी येऊ शकतो. त्या दिवशी मात्र गेल्याचे सार्थक झाले. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले लांबच लांब वेगवेगळ्या रंगांचे पट्टे बघून डोळ्यांचे पारणे फिटते. नवरा म्हणाला ही तर कलर थेरपी आहे. फुललेला पॅच दिसला की थांबा मनसोक्त फोटो काढा पुढे चला असे करताना मनंच भरत नाही. प्रत्येक ठिकाणी फुलांचा एखादा नवीन रंग दिसला की थांबत होतो.

Tulips, Netherlands, Lisse, Tulip Fields, Tulip Season

परत येताना डायरेक्ट हायवेला न लागता मुद्दामहून आतला रस्ता घेतला होता. वाटेत अनेक सुंदर छोटी छोटी डच खेडी लागत होती. लाँग ड्राइव्हला जाऊन असे भटकायला आम्हाला दोघांनाही खूप म्हणजे खूपच आवडते. थोडंस आडबाजूला गेलं की शहरांच्या पलिकडचा देश बघायला मिळतो. किंग्ज डे असल्यामुळे घराघरांवर राष्ट्रध्वज लावले होते. हे फोटो मात्र काढायचे राहून गेले. लक्षातच आलं नाही. नंतर मला खूपच चुटपूट लागली. एका गावात जेवायला थांबलो ते गाव तर खूपच छान होतं. एक कम्युनिटी सेंटर किंवा गावची चावडी म्हणता येईल अशी बिल्डिंग होती. मध्ये मोठा चौक होता आणि तिन्ही बाजूंनी रेस्टाॅरंस होती. मास्क न लावता, लाॅक डाऊनचे सगळे नियम गुंडाळून लोक मस्त उंडारत होते. किंग्ज डेमुळे सगळे सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होते. चौकात मांडव टाकून, खुर्च्या टेबलं टाकून संध्याकाळच्या पार्टीची तयारी चालली होती.  आम्ही उभ्या उभ्याच झकास गरम गरम चीज omelette आणि ब्रेडवर ताव मारला आणि जोडीला टोम्पाश (tompouce).

टोम्पाश हे डेझर्ट नेदरलँडमध्ये खूप लोकप्रिय आहे. आपल्याकडे कसं प्रत्येक सणाचं पक्वान्न ठरलेलं असतं तसाच किंग्ज डे ला टोम्पाशचा मान असतो. दोन चौकोनी बिस्किटांच्यामध्ये पुडिंग भरलं की झालं टोम्पाश. एरवी वरचं फ्राॅस्टिंग गुलाबी असतं, पण किंग्ज डेला खास केशरी रंग असतो. रंग, रूप बघून पेस्ट्रीसारखा काहीतरी प्रकार असेल असं वाटलं होतं. पण नुसतीच गोड चव होती. किंग्ज डेच्या दिवशी नेदरलँडमध्ये बघावं तिकडे केशरी रंग दिसतो. आम्ही जेवत असताना आजूबाजूला छोटी छोटी मुलं प्लेन orange रंगाचे कपडे घालून मस्त बागडत होती आणि मोठी माणसं बहुतेक संध्याकाळची पार्टी कशी असेल या विवंचनेत होती. रेस्टाॅरंटसच्या आजूबाजूला भटकून काहीजण अंदाज घेत होते. मजा म्हणजे एकजण येऊन आम्हाला विचारूनही गेला की संध्याकाळी इकडे पार्टी होणार आहे का? म्हटलं बाबा रे आम्हाला नाही माहित. आम्ही टूरिस्ट आहोत, या गावचे नाही आणि तसही पार्टीपेक्षा आम्हाला आता घरी असलेली आमची दोन कार्टी दिसत होती.

2 thoughts on “ट्युलिप्स, टोम्पाश आणि उनाड दिवस – 2

Leave a Reply