ट्युलिप्स, टोम्पाश आणि उनाड दिवस – 1

Tulips, Tompouce and Netherlands – 1 Refreshing Colour Therapy

Tulips, Netherlands, Tulip Season, Tulip Fields

24 एप्रिलपासून मला आणि मुलींना ‘मे ब्रेक’च्या सुट्ट्या लागल्या. या सुट्ट्यांमध्ये एक मोठी कामगिरी पार पाडायची होती ती म्हणजे “मिशन ट्युलिप्स’. मागचा सीझन तर कोविडमुळे वायाच गेला. ते सगळे व्हिडिओज सगळीकडे चांगलेच गाजले होते. शेतकर्‍यांनी ट्रक भरभरून फुले नष्ट केली होती. कुठे पाठवायचीच नाहीयेत, घेणारच कोणी नाहीये तर फुलांच करायच काय? या ट्युलिप्सच हे लोकं करतात तरी काय? हा प्रश्न मलाही पडला होता. मग त्या संदर्भात शोध घेतला असता बरीच नवीन माहिती मिळाली. ट्युलिप्सची शेती करण्याचा मुख्य हेतू उत्तम प्रतीचा जोमदार कंद (bulbs) मिळविणे हा असतो. म्हणजेच फुलं जेव्हा हवी तशी, हवी तेवढी फुललेली असतात (blooms) तेव्हाच जमिनीच्या खाली उत्तम प्रतीचा जोमदार कंद तयार झाला असतो. तो मग काढून घेऊन त्याची वर्गवारी करून, पॅकिंग करून जगभरात सगळीकडे पाठवला जातो. त्यामुळे फुलं बघायची तर अचूक वेळ गाठावी लागते.

शिवाय मित्रमैत्रिणींकडून बोलता बोलता एवढ्या सगळ्या भानगडीतही गेल्यावर्षी ओळखीपाळखीचे काहीजण ट्युलिप्स फिल्डसना जाऊन आल्याचे कळले. नुसतेच गेले नाहीत, तर त्यांना शेतात छान फुलांमध्ये निवांतपणे फिरता आलं, मस्त फोटो काढले अशा बातम्या कानावर आल्या. त्यामुळे या वर्षी सीझन सुरू होताच डोळ्यासमोर फक्त आणि फक्त ट्युलिप्सच दिसंत होती. मी वर म्हटल्याप्रमाणे हा जेमतेम 15 – 20 दिवसांचा खेळ असतो. मग आठवडाभर आम्ही दोघांनी इंटरनेटवर जितका सर्व्हे करता येईल तितका केला, मित्रमैत्रिणींशी बोलून माहिती गोळा केली. त्याप्रमाणे डोळे मिटून, एकमुखाने सगळ्यात आधी जे नाव समोर आले ते म्हणजे ‘लिसे’ (Lisse). लिसेलाच वर्ल्डफेमस ‘क्युकेनहाॅफ’ (Keukenhof) असले तरी लिसे म्हणजे फक्त क्युकेनहाॅफ नाही हे प्रत्यक्ष तिकडे गेल्यावरच कळते. 

मग 24 तारखेला शनिवारी सेफसाइड लिसेपासूनच मुहूर्त करायचे ठरले. क्युकेनहाॅफ हा मुद्दाम डेव्हलप केलेला टुरिस्ट स्पाॅट आहे. पण त्याव्यतिरिक्त नेदरलँडस् मध्ये ठिकठिकाणी असलेले ट्युलिप्सचे मळे बघितले की ट्युलिप्स ही काय चीज आहे ते कळतं. ही शेतं अर्थातच वैयक्तिक मालकीची असतात. तसं बघितलं तर आत जायला सगळीकडे रितसर परवानगी नसते. पण जाऊ नका म्हणून पहारा द्यायलाही कोणी नसतं. लोकं शांतपणे फुले बघत, फोटो काढत होते. मुळात लोकं म्हणायला आम्ही चौघे धरून जेमतेम 15 – 20 माणसांपेक्षा जास्त कुठेच दिसली नाहीत. पण काही का असेना लोकांची मानसिकता लगेच लक्षात येते. रंगीबेरंगी फुकटची फुलं दिसतायत ना. मग ओरबाडा आणि न्या बरोबर ही वृत्ती अजिबातच दिसली नाही. एक दोन ठिकाणी शेतमालक येऊन सगळ्यांना बाहेर निघायला सांगूनही गेले. त्यांच म्हणणं होतं आत न जाता बाहेरून बघा. पण ते सांगून निघून जात होते. माणसं तेवढ्यापुरतं बाजूला होऊन मग परत पहिल्यासारखं. त्या दिवशी मुहूर्त तर झाला पण हे म्हणजे वाघाच्या तोंडाला रक्त लागण्यासारखं होतं. ट्युलिप्स बघायला तर मिळाली पण, थोडसं लवकर आलो असं वाटत होतं. थंडीमुळे फुलं छान हवी तशी फुलली नव्हती. थंडी अजूनही आहेच. बर्‍याच ठिकाणी फक्त छोट्या छोट्या कळ्या दिसत होत्या. ती रोपं थोडी मोठी झाल्यावर दिसणार्‍या दृश्याची फक्त कल्पना केल्यावर हावरटपणा वाढत होता. ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है दोस्त.

Tulips, Netherlands, Tulip Fields, Tulip Season, Zesty Flavours

3 thoughts on “ट्युलिप्स, टोम्पाश आणि उनाड दिवस – 1

  1. फोटो तर लाजवाब !! आमचा कधी योग येतो काय माहित

  2. प्रोत्साहनाचा मनापासून स्विकार रोहिणीताई!

Leave a Reply