About

Shivali (Ashwini)

नमस्कार!

मी शिवाली वरवंडकर. माहेरची अश्र्विनी सुभेदार. Khadadi With Shivali ह्या फूड ब्लाॅगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप सहर्ष स्वागत.

माझ्याबद्दल थोडेसे –

मुंबईजवळच्या, ठाणे जिल्ह्यातील – अंबरनाथ हे माझं माहेर आणि जन्मगावही. पांडवकालीन शिवमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले शहर. 

20 – 25 वर्षांपूर्वी मला कोणी सांगितलं असतं की तू फूड ब्लाॅग लिहिणार आहेस तर मी त्या व्यक्तीला हसले असते. पण मागे वळून बघताना जाणवतं की काही काही गोष्टींचे संस्कार हे आपल्यावर आपोआप कळत नकळत होत असतात. 

आठवीत असताना मी चहा करायला शिकले. माझ्या बाबांनी मला शिकवला. त्यानंतर लग्न होईपयर्यंत चहा, क्वचित कुकर लावणे, आमटीला फोडणी देणे याशिवाय प्रत्यक्ष स्वयंपाकाशी काहीही संबंध नव्हता. मुलगी म्हणून साइड बाय साइड या गोष्टीसाठी तयार करणे असे विचार आणि वातावरण सुदैवाने घरी अजिबातच नव्हते. पण बाहेरची कामं, आईला वरची मदत, भाजी आणणे- इतर खरेदी या सगळ्याची सवय होतीच. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पूर्णवेळ गृहिणी म्हणून आई घरासाठी विशेषत: स्वयंपाकघरात काय काय करते ते बघतच लहानाचे मोठे होत होतो. लोणची, मुरंब्यापासून ते पापड, साबुदाण्याच्या चिकवड्या, सांडगी मिरच्या सगळ्या गोष्टी तेव्हा कटाक्षाने घरीच करायची पद्धत होती. केक, पावभाजी, इडल्या डोसे असे पदार्थ त्याकाळी म्हणजे 80 – 90च्या दशकातसुद्धा माझी आई नियमित घरी करायची. मग पापड लाटायला, चिकवड्या घालायला आई, आजीला(आईची आई) मदत करायची. दिवाळीत आजी, आई आणि मी आम्ही तिघी मिळून फराळाचं करायचो. करंज्या करताना, शंकरपाळे करताना लाटायला, भरायला बसायचं. बाकी पीठ कसं भिजवतात, सारण कसं करतात ह्याच्याशी काहीही कर्तव्य नसायच. माझी आई नियमित घरी करायची. मग पापड लाटायला, चिकवड्या घालायला आई, आजीला(आईची आई) मदत करायची. दिवाळीत आजी, आई आणि मी आम्ही तिघी मिळून फराळाचं करायचो. करंज्या करताना, शंकरपाळे करताना लाटायला, भरायला बसायचं. बाकी पीठ कसं भिजवतात, सारण कसं करतात ह्याच्याशी काहीही कर्तव्य नसायच.

काॅलेजला असतानाच टायपिंगची परीक्षा झाल्यावर टाइमपास, मजा म्हणून 2 – 3 छोट्या छोट्या नोकर्‍या केल्या. काॅम्प्युटरचा Office Automation चा कोर्सही केला. मराठी लिटरेचरमध्ये M.A.करत असताना अंबरनाथमधल्याच एका प्रसिद्ध कंपनीत नोकरीची संधी मिळाली. नोकरी आणि एकीकडे M.A. चालू असतानाच योगायोगाने दोनाचे चार हात झाले.

माहेरची मी कर्‍हाडे म्हणण्यापेक्षा कोकणी – कर्‍हाडे म्हणणे जास्त योग्य राहील. माझ्या आईवडिलांचा, दोघांचाही जन्म मुंबईचा असला तरी मूळ गावं कोकणातली. याउलट सासर पक्के वर्‍हाडी देशस्थ आणि तेही पिढ्यानपिढ्या मध्यप्रदेशात स्थायिक. त्यामुळे गूळ, नारळ, मऊभात मेतकुटापासून सूरू झालेला माझा प्रवास आता वडा, पुरण, कढी, पातळभाजी असा सुरू झाला. बरबटी आणि टिंडे या नावाच्याही भाज्या असतात हे मला लग्नानंतर समजलं.🙂 पण सासुबाईही तितक्याच सुगरण असल्यामुळे मग देशस्थी स्वयंपाकाशी ओळख झाली.

लग्नानंतर नवर्‍याच्या आय. टी.तल्या नोकरीमुळे पुण्याला सेटल झालो. त्यानंतर US, परत पुणे अशी येजा करत सध्या मी नेदरलंँडला आहे. लग्नानंतर सुरवातीची काही वर्ष ही स्थिरस्थावर होण्यात गेली. तो काळ संघर्षाचा, परिक्षेचा होता. मनाली 1 वर्षाची असताना आवड आणि हौस म्हणून प्री प्रायमरी टिचर्सचा कोर्सही केला. रेणुका दोन वर्षाची असताना आम्ही आमच्या बावधनच्या घरात शिफ्ट झालो आणि 6 महिन्यांनी परत USला. मिनिसोटाच्या आठवणींबद्दल मी आधी लिहिलं आहे. ती पोस्ट नक्की वाचा. मनिषची नोकरी आणि शिवाय आता मुलींची शिक्षणं या ना त्या निमित्ताने ही भटकंती चालूच आहे.

मनालीची 12वी झाल्यावर 2019च्या आॅगस्टमध्ये आम्ही नेदरलँडला आलो. मुली मोठ्या झाल्यामुळे आता माझ्याकडे भरपूर वेळ होता. त्यामुळे माझा निर्णय पक्का झाला. माझ्या तिसर्‍या बाळाला, Khadadi with Shivali ला जन्म देण्याचा. 

‘खादाडी’ची सुरूवात तशी पुण्याला असतानाच झाली होती. तेव्हा मी खादाडीचं फक्त फेसबुक पेज क्रिएट केलं होतं. काही पोस्टस् शेअरसुद्धा केल्या होत्या. नंतर मग movingच्या गडबडीत काही झालं नाही. ब्लाॅगस्पाॅट, Zesty Flavours असं करत करत हे बाळ बाळसं धरत गेलं आणि आता Khadadi with Shivali नव्याकोर्‍या, अधिक आकर्षक स्वरूपात सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी खूप excited आहे. तुमच्या भरभरून मिळणार्‍या प्रेमाशिवाय आणि प्रोत्साहनाशिवाय हा प्रवास शक्यच नव्हता.

Khadadi with Shivali हा वेगवेगळ्या प्रकारच्या शाकाहारी (Vegetarian) Recipesचा ब्लाॅग आहे. त्या शिवाय Beyond Recipes मध्ये तुम्हाला माझ्या इतर काही छंदांबद्दल वाचायला मिळेल.

ब्लाॅगच्या निमित्ताने – मला अत्यंत प्रामाणिकपणे सांगावसं वाटतं की मी स्वयंपाकात फार expert आहे असं अजिबातच नाही. अजूनही मी शिकत आहे आणि बरेच काही शिकायचे आहे. पण गेली 22 वर्ष किचनमध्ये आहे. स्वयंपाक करत्येय. मी माझ्या किचनमध्ये जे जे काही करते ते मी या ब्लाॅगवर शेअर करते.

मला किचनमध्ये प्रयोग करायला आवडतात. जेव्हा मी एखादी रेसिपी बघते, वाचते तेव्हा तशीच्या तशी न करता स्वत:च्या पद्धतीने करून बघते. तिला त्यातल्या त्यात हेल्दी करण्याकडे माझा कल असतो. आहारशास्त्र किंवा Food & Nutrition या विषयाचे कोणतेही प्रोफेशनल शिक्षण मी घेतले नाहीये. पण मला याविषयी वाचायला, माहिती मिळवायला खूप आवडते.

Beyond Recipes – याशिवाय मला Embroidery, Art & Craft, Home Decor, DIY, Travel आणि वाचनाचा छंद आहे. Beyond Recipesमध्ये तुम्हाला याबद्दल वाचायला मिळेल.

माझा नवरा आणि मुली यांनी सतत मला दिलेल्या प्रोत्साहनामुळेच माझ्या छंदाचे रूपांतर आज या ब्लाॅगमध्ये झाले आहे. ही वेबसाइट नवीन, आकर्षक स्वरूपात तुम्ही जी बघताय त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या नवर्‍याला जाते. त्याच्या कामाच्या अतिशय बिझी शेड्युलमधून वेळ काढून शिवाय विकेंडला तासनतास बसून त्याने ही वेबसाइट तयार केली आहे. तो स्वत: उत्तम कुक आणि खवैया असल्यामुळे वेळोवेळी त्याच्याकडून मिळालेल्या टिप्सचा मला ब्लाॅगसाठी पुरेपूर उपयोग होतो.

या ब्लाॅगमधल्या रेसिपीज करून बघताना तुम्हाला काही शंका असल्यास मला कमेंटसमध्ये जरूर कळवा. तुमच्या सूचना आणि अभिप्रायांचे कायम स्वागत असेल. रेसिपी आवडल्यास तुमचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये कृपया शेअर करायला विसरू नका.

माझ्याशी संपर्क करायचा असल्यास खाली दिलेल्या ईमेल पत्त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच Facebook, Twitter, Instagram, Pinterest वरही तुम्ही हा ब्लाॅग फाॅलो करू शकता.

लोभ असावा हिच विनंती!

शिवाली वरवंडकर (अश्र्विनी सुभेदार)

Khadadi with Shivali, https://ZestyFlavours.com

Email: khadadiwithshivali@gmail.com